Hardik Pandya
नवी दिल्ली, 7 डिसेंबर: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) बुधवारपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “बडोदा क्रिकेट असोसिएशनने (BCA) हार्दिकला विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल विचारणा करणारा ईमेल पाठवला होता. गेल्या तीन वर्षांत तो बडोद्याकडून फारसा खेळला नाही. बीसीएच्या मेलला एका ओळीत उत्तर देत रिहॅबच्या प्रोसेसमधून जात असल्याची माहिती दिली. हार्दिक पांड्या 2019 पासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. 2019 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. पण, तेव्हापासून त्याला बॉलिंग करण्यास अडथळा येत आहे. सध्या त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्या बडोदा कॅम्पमध्ये सामील झाला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले होते की, संघ शिबिरात उपस्थित राहणारा खेळाडूच समाविष्ट करू शकतो. हार्दिकप्रमाणेच कृणाल पांड्याही संघाबाहेर आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी हार्दिकला आज ना उद्या देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळून बीसीसीआयने सर्व पक्षाबाहेरील खेळाडूंना त्यांचा फॉर्म आणि फिटनेस परत मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील रिहॅबची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर हार्दिक पांड्यालाही फिटनेस चाचणीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जावे लागेल. पूर्वीच्या क्रिकेटपटूंना थेट एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळायचे. पण, राहुल द्रविड येथे प्रमुख झाल्यावर त्याने नियम बदलले. आता प्रमाणपत्रापूर्वी खेळाडूंना एनसीए प्रशिक्षकासमोर फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे.