मुंबई, 29 फेब्रुवारी : पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पाच महिन्यानंतर धमाक्यात पुनरागमन केलं. पांड्यानं डीवाय पाटील टी20 टूर्नामेंटमध्ये रिलायन्स वनकडून खेळताना तडाखेबाज खेळी केली. पांड्याने 25 चेंडूत 38 धावा करत आपण तंदुरुस्त असल्याचं दाखवून दिलं. फक्त फलंदाजीच नाही तर पांड्याने गोलंदाजीतही कमाल केली. पण याचवेळी केलेल्या एका चुकीमुळं त्याला पुन्हा एकदा बीसीसीआयचा दणका बसू शकतो. दणक्यात पुनरागमन करणाऱ्या पांड्याविरुद्ध बीसीसीआय कारवाई करू शकते. याआधी पांड्याला कॉफी विथ करण कार्यक्रमांत महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं संघाबाहेर बसावं लागलं होतं. आता त्यानं डीवाय पाटील टी20 कपमध्ये रिलायन्स वनकडून खेळताना फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल केली. मात्र फलंदाजी करताना मैदानात उतरताना पांड्या हेल्मेट कोणतं घातलं ते विसरला यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या फलंदाजीला मैदानात आला तेव्हा त्याने टीम इंडियाचे हेल्मेट घातले होते. यामुळेच त्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआय़च्या नियमानुसार कोणताही राष्ट्रीय क्रिकेटपटू घरेलू क्रिकेटमध्ये बीसीआयचा लोगो असलेलं हेल्मेट वापरू शकत नाही. असं झाल्यास ते नियमाचे उल्लंघन ठरते. हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर रिलायन्स वनने बँक ऑफ बडोदाविरुद्ध 150 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या बँक ऑफ बडोदाच्या संघाला 125 धावांपर्यंत मजल मारता आली. रिलायन्सने हा सामना 25 धावांनी जिंकला. पांड्याने गोलंदाजी करताना 3 गडीही बाद केले. पांड्याने भारताकडून अखेरचा सामना सप्टेंबर महिन्यात खेळला होता. पांड्याला त्यावेळी टी20 सामन्यात दुखापत झाली होती. टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने पांड्याला उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात पांड्या खेळेल असं म्हटलं जात होतं. पण त्याला संधी मिळाली नाही. वाचा : क्रिकेटपटू एवढा तापला की डोक्यातून धूर निघाला? VIDEO VIRAL फिटनेस नसल्यानं पांड्याला संधी मिळाली नाही. पुनरागमन करताना पांड्यानं तंदुरुस्त असल्याचं दाखवून दिलं आहे. यानंतर 12 ते 18 मार्च पर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांनाही दुखापत झाली होती. धवनने रिलायन्स वनकडून फक्त 14 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानं फलंदाजी करताना नाबाद 10 धावा केल्या. वाचा : शेफालीच्या आक्रमक खेळीमुळे भारताचा विजयी चौकार! श्रीलंकेला 7 विकेटनं दिली मात