लंडन, 1 जानेवारी : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) दारूण पराभव झाला आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमधल्या पहिल्या तिन्ही मॅच इंग्लंडने (Australia vs England) गमावल्या आहेत. इंग्लंडच्या या खराब कामगिरीचं खापर माजी कर्णधार मायकल अथर्टन (Michael Atherton) याने आयपीएलवर (IPL) फोडलं आहे. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आयपीएल खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब गेलं नाही पाहिजे, असं अथर्टन यांनी सांगितलं. इंग्लंडने पहिल्या तिन्ही मॅच हरल्यामुळे सीरिजही गमावली आहे. इंग्लंडच्या या कामगिरीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. मायकल अथर्टन यांनी द टाईम्समध्ये स्तंभ लिहिला, त्यात त्यांनी आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर राहू नये, तसंच खेळाडूंना आराम देण्याची आणि रोटेट करण्याचीही गरज नाही, असं मत मांडलं. ‘अनेक फॉरमॅट खेळणाऱ्या प्रमुख खेळाडूंना 7 अंकी धनराशी दिली जाते, पण वर्षाचे दोन महिने आयपीएल वेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डासाठी हे खेळाडू देशासाठी उपलब्ध नसतात. खेळाडूंच्या आयपीएल खेळण्याबाबत विचार केला जाईल, कारण खेळाडू बोर्डासोबत 12 महिन्यांसाठी करारबद्ध आहेत, असं इसीबीने सांगितलं पाहिजे. इंग्लंड टीमचं हित पाहूनच खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी एनओसी दिलं गेलं पाहिजे,’ अशी कठोर भूमिका मायकल अथर्टननी घेतली. 1993 ते 2001 दरम्यान 54 टेस्टमध्ये टीमचं नेतृत्व करणाऱ्या मायकल अथर्टनने रूटऐवजी बेन स्टोक्सला इंग्लंडचं नेतृत्व द्यावं, अशी मागणी केली. मागच्या वर्षी बॅटने धमाकेदार कामगिरी करणाऱ्या जो रूटच्या ऍशेसमधल्या कॅप्टन्सीवर टीका करण्यात येत आहे. ‘टीम निवडीपासून ते रणनितीपर्यंत एवढ्या चुका केल्याबद्दल कर्णधाराला जबाबदारी स्वीकारावी लागेल. रूटने जर मैदानातल्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या असत्या, तर ही सीरिज अटीतटीची झाली असती. कर्णधारासोबतच प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे,’ असं अथर्टन म्हणाला. चौथी टेस्ट मॅच सिडनीमध्ये 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे.