मुंबई, 12 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) चा लिलाव फेब्रुवारी महिन्यात 12 आणि 13 तारखेला होणार आहे. त्याआधी आयपीएलच्या 8 जुन्या टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले आहेत, तर अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या टीम लिलावाआधी प्रत्येकी 3-3 खेळाडूंना विकत घेणार आहे. आयपीएलच्या लिलावासाठी सगळ्याच टीम रणनिती आखत असतानाच आता त्यांना मोठा धक्का बसण्याती शक्यता आहे. याचं कारण इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतील का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इंग्लंडच्या टीमची ऍशेसमध्ये निराशाजनक कामगिरी झाली, त्यामुळे या पराभवाची समिक्षा इंग्लिश क्रिकेट बोर्ड करणार आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ऍशेसमध्ये (Ashes Series) इंग्लंड 3-0 ने पिछाडीवर आहे. ब्रिस्बेन, ऍडलेड आणि मेलबर्नमध्ये इंग्लंडला (Australia vs England) पराभवाला सामोरं जावं लागलं, तर सिडनीमध्ये ब्रॉड आणि अंडरसनच्या अखेरच्या जोडीने चौथी टेस्ट ड्रॉ केली. सीरिजची पाचवी टेस्ट 14 जानेवारीपासून होबार्टमध्ये सुरू होणार आहे. मिरर डॉट को डॉट यूकेने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड क्रिकेटचे डायरेक्टर एशले जाईल्स एक रिपोर्ट तयार करणार आहेत, यात टेस्ट टीममध्ये सुधारणा करण्याच्या अनेक शिफारसी असतील. यात इंग्लंडच्या क्रिकेटपटूंवर आयपीएल बंदीबाबतही विचार केला जाणार आहे. आयपीएल जवळपास दोन महिने चालते, पण यावर्षी दोन नव्या टीम आल्यामुळे स्पर्धेची वळही वाढणार आहे. आयपीएल 2022 इंग्लंडध्ये टेस्ट क्रिकेटचा मोसम सुरू व्हायच्या वेळीच संपतो. यावर्षी जून महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सीरिज होणार आहे. ही सीरिज आयपीएलच्या नॉकआऊट सामन्यांच्यावेळी असण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यामध्ये इंग्लंडचे बरेच खेळाडू सहभागी होणार आहेत. आतापर्यंत टीमी जॉस बटलर (Jos Buttler) आणि मोईन अली (Moeen Ali) या दोन खेळाडूंनाच रिटेन केलं आहे. इंग्लंडच्या माजी खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलला महत्त्व दिल्याबद्दल अनेकवेळा टीका केली आहे. मायकल अथर्टन यांनीही काहीच दिवसांपूर्वी यावर भाष्य केलं होतं. इंग्लंड क्रिकेट बोर्ड प्रमुख खेळाडूंना सात अंकी रक्कम देते. हा करार वर्षाचा असतो, पण आयपीएलदरम्यान इंग्लंडसाठी दोन महिने खेळाडूच उपलब्ध नसतात, असं अथर्टन म्हणाले होते. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक देशाच्या खेळाडूला त्यांच्या क्रिकेट बोर्डाचं एनओसी असणं बंधनकारक असतं.