मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) गुरुवारी क्रिकेट फॅन्सना धक्का दिला. त्यानं टी20 वर्ल्ड कपनंतर या फॉर्मेटमधील कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या निर्णयाची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर विराटनं हा निर्णय का घेतला? याचं कारणही सांगितलं आहे. बीसीसीआयनं या विषयावर प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यानुसार गांगुलीनं विराटचं वर्णन भारतीय क्रिकेटची ‘खरी संपत्ती’ असं केलं आहे. त्याचबरोबर हा निर्णय भविष्याचा विचार करत घेतल्याचं गांगुली यावेळी म्हणाले. ‘विराट हा भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती आहे. त्यानं टीमचं जबरदस्त नेतृत्त्व केलं. तसंच तो सर्व प्रकारातील भारताच्या यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे. विराटनं हा निर्णय भविष्याचा रोडमॅप लक्षात घेऊन घेतला आहे. टी20 टीमचा कॅप्टन म्हणून विराटनं दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. तसंच त्याचा आगामी वर्ल्ड कप आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तो भविष्यातही भारतासाठी भरपूर रन करेल अशी आशा आहे.’ अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली आहे. विराट कोहलीच्या कॅप्टनसी सोडण्याच्या निर्णयावर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया… विराट कोहलीनं टी 20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याशी चर्चा करुन घेतल्याचं जाहीर केलं आहे. ‘रवीभाई (रवि शास्त्री)आणि लीडरशिप ग्रूपचा महत्त्वाचा भाग असलेला रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करून मी या निर्णयाप्रत आलो आहे की, ऑक्टोबरमध्ये T20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर मी भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त होईन. BCCI चे पदाधिकारी जय शाहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांनादेखील माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे’, असं विराटने म्हटलं आहे.