मुंबई, 14 ऑक्टोबर : टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा कोच कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टीम लगेच न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच होणार अशी चर्चा आहे. (Rahul Dravid likely to be the Indian coach for the New Zealand series) भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी द्रविड टीम इंडियाचा हेड कोच होण्याची शक्यता असल्याचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलं आहे. नव्या कोचच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे दरम्यानच्या काळात अनुभवी द्रविडकडं ही जबाबदारी सोपवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. भारतीय टीमचा कोच होण्यासाठी काही ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू तसंच कोच इच्छूक आहेत. पण रवी शास्त्रींचा उत्तराधिकारी भारतीय असेल, असं बीसीसीआनं स्पष्ट केलं आहे. टीम इंडियाचे यापूर्वी 4 प्रशिक्षक विदेशी होते. जॉन राइट, ग्रेग चॅपेल, गॅरी कर्स्टन आणि डंकन फ्लेचर यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. चॅपल यांच्या दोन वर्षांच्या यापैकी सर्वात कठीण टप्पा भारतीय क्रिकेटने पाहिला आहे. त्याचवेळी, गॅरी कर्स्टनच्या प्रशिक्षणाखाली, कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संघाने 2011 च्या विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी भारतीयच; BCCI ने दिली माहिती! राहुल द्रविड यापूर्वी 2015 ते 2019 या कालावधीमध्ये भारत ए आणि अंडर-19 टीमचा कोच होता. तसेच तो सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक आहे. द्रविडनं टीम इंडियाचा पूर्णवेळ हेडकोच व्हावं अशी बीसीसीआयची इच्छा होती, पण द्रविडनं ती ऑफर नाकारली आहे.