मुंबई, 22 डिसेंबर : पाकिस्तानातील हिंदू मंदिराची तोडफोड केल्याचे आणखी एक प्रकरण उघड झाले आहे. पाकिस्तानातील प्रमुख शहर असलेल्या कराचीमध्ये (Karachi) मंदिरावर सोमवारी हल्ला केला आहे. कट्टरपंथियांनी दुर्गा माता मंदिरात तोडफोड केली असून दुर्गा मातेच्या मूर्तीचीही विटंबना केली. या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) व्यथित झाला आहे. त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याकडे धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. कनेरिया हा पाकिस्तानच्या क्रिकेट टीमकडून आंतररराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या मोजक्या हिंदू क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली असून यामध्ये कराचीच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर तडजोड होता कामा नये. या प्रकराच्या घटनेमुळे पाकिस्तानची जगात बदनामी होत आहे, असं मत व्यक्त केले. पंतप्रधान इम्रान खान यांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कराचीच्या घटनेपूर्वी सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात स्थित नागारपारकरात धार्मिक अतिरेक्यांनी देवी दुर्गेच्या मूर्तीची विटंबना केली होती. या हल्लेखोरांनी मंदिरात खूप नुकसान केलं होतं. मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले की रात्री उशिरा काही अज्ञात लोक मंदिराच्या परिसरात घुसले. यानंतर त्यांनी दरवाजा बंद केला आणि मूर्तीची विटंबना केली. या हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. पोटगी म्हणून दिले 5 हजार 540 कोटी रुपये; वाचा ‘शाही’ घटस्फोटाची Inside Story दानिश कानेरिया पाकिस्तानकडून 61 टेस्ट आणि 18 वन-डे मॅच खेळला आहे. त्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसंच यापूर्वी टीममधील सहकारी खेळाडूंवर धार्मिक आधारावर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.