मुंबई, 10 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेतून दरवर्षीच टीम इंडियाला चांगले खेळाडू मिळाले आहेत. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) तर टी20 वर्ल्ड कपपूर्वी होत आहे. त्यामुळे या स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवड समितीचं विशेष लक्ष होतं.आयपीएल स्पर्धेत आठवडाभरापूर्वीच पदार्पण करणाऱ्या 21 वर्षांच्या तरुण बॉलरला त्याच्या चांगल्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये त्याची निवड झाली आहे. सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) फास्ट बॉलर उमरान मलिकचा (Umran Malik) आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियात नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला आहे. ‘एएनआय’नं हे वृत्त दिलं आहे. जम्मू काश्मीरच्या या फास्ट बॉलरनं या आयपीएलमध्ये त्याच्या वेगानं कॅप्टन विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेकांना प्रभावित केलं होतं. या स्पर्धेतील सर्वात फास्ट बॉल टाकणारा भारतीय बॉलर म्हणूनही त्यानं रेकॉर्ड केला होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ‘उमरान नेट बॉलर म्हणून टीम इंडियासोबत असेल. त्यानं त्याच्या वेगानं प्रभावित केलं आहे. नेट्समध्ये त्याच्या बॉलिंगचा सामना करणे हे बॅटरच्या फायद्याचे आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या बॉलर्सना बॉलिंग केल्यानं त्यालाही बरच शिकता येईल.’ आठवडाभरापूर्वीच पदार्पण सनरायझर्स हैदराबादचा फास्ट बॉलर टी. नटराजन (T. Natarajan) याला कोरोना झाल्यानं उमरानचा टीममध्ये समावेश करण्यात आला. त्यापूर्वी तो हैदराबादचा नेट बॉलर होता. त्यानं 3 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी त्यानं त्याच्या वेगानं नवा रेकॉर्ड केला. IPL 2021 : भारताला मिळाला वेगाचा बादशाह, वकार युनूससारखी बॉलिंग ऍक्शन, पाहा VIDEO रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये उमराननं देवदत्त पडिक्कलला सलग तीन बॉल 150 किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं टाकले. त्यापैकी तिसरा बॉल तर त्यानं 153 किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं टाकला. जो आयपीएलमधील भारतीय रेकॉर्ड आहे.
उमरानच्या वेगाची टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंही प्रशंसा केली होती. त्याच्यातील गुणवत्तेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असं मत विराटनं मॅचनंतर व्यक्त केलं होतं. आता त्यापाठोपाठ त्याची टीम इंडियात निवड झाली आहे.