मुंबई, 28 एप्रिल : देशात गेल्या महिनाभरात कोरना व्हायरसच्या (coronavirus) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशातील या बातम्यांचा मनावर परिणाम होऊन काही विदेशी खेळाडूंनी आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडत मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू एन्ड्र्यू टाय (Andrew Tye), केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि एडम झम्पा (Adam Zampa) यांनी भारतातल्या कोरोना संकटामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर हे खेळाडू भारतावर टीका करु लागले आहेत. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर एन्ड्रयू टायनं यापूर्वी भारतामधील परिस्थितीवर टीका केली होती. आता त्यानंतर ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर एडम झम्पा याने देखील बायो-बबलच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहे. आत्तापर्यंतच्या बायो-बबलमध्ये हे सर्वात असुरक्षित बायो-बबल होते. या स्पर्धेचं आयोजन हे भारताच्या ऐवजी युएईमध्ये करायला हवं होतं, असं मत झम्पानं व्यक्त केलं आहे. झम्पानं ‘सिडनी मार्निंग हेरॉल्ड’ या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतामधील वातावरणावर टीका केली आहे. “मला युएईमध्ये अधिक सुरक्षित वाटत होतं. तिथं मागच्या वर्षी ही स्पर्धा झाली होती. आम्ही आजवर सुरक्षित बायो-बबलमध्ये राहिलो आहोत. माझ्या मते हे सर्वात असुरक्षित बायो-बबल होते. आम्हाला इथं अनेकदा स्वच्छतेबद्दल सांगितलं जायचं. तसेच अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागत होती. मला इथं सर्वाात जास्त असुरक्षित वाटलं.” टी20 वर्ल्ड कपवर होणार चर्चा भारतामध्येच ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कप होणार आहे. झम्पानं या मुलाखतीमध्ये तो मुद्दा देखील उपस्थित केला आहे. “आयपीएल स्पर्धा सहा महिन्यांपूर्वी दुबईमध्ये झाली. आम्हाला तिथं असं अजिबात वाटलं नाही. माझ्यामध्ये आयपीएलसाठी तो पर्याय उत्तम होता. अर्थात याच्याशी अनेक राजकीय मुद्दे निगडित आहे. भारतामध्येच यावर्षी टी20 वर्ल्ड कप होणार आहे. क्रिकेट विश्वात बहुधा आगामी काळात याच विषयावर चर्चा होईल.” असा दावा झम्पानं केला. ब्रेट लीने पुन्हा दाखवलं भारत प्रेम, कोरोना लढाईसाठी दिली मोठी मदत स्पर्धा सोडण्याची ही योग्य वेळ " इथं कोव्हिडची परिस्थिती गंभीर आहे. मला टीममध्ये खेळण्याची संधी मिळली नाही. मी ट्रेनिंगसाठी जात होतो, पण मला कोणतीही प्रेरणा मिळत नव्हती. मला वाटलं निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आयपीएलमुळे लोकांना दिलासा मिळतो, असं काही जणांचं मत आहे. पण ही अत्यंत खासगी बाब आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्य मृत्यूशी झगडा देत असेल तर तो क्रिकेटची पर्वा करणार नाही." असं झम्पानं स्पष्ट केलं.