कोलंबो, 23 जुलै: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेमध्ये युवा बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) याने पदार्पण केले आहे. चेतनला त्या आयपीएल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे ही संधी मिळाली आहे. चेतननं आयपीएल स्पर्धेतील 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना सर्वांना प्रभावित केले होते. त्याने 7 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या. चेतनचा संघर्षपूर्ण प्रवास सौराष्ट्रकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या चेतनवर निवड समितीनं मोठा विश्वास दाखवत त्याचा श्रीलंका दौऱ्यात समावेश केला. चेतनचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास मोठा संघर्षपूर्ण ठरला आहे. तो वर्षभरापूर्वी आयपीएल स्पर्धेत नेट बॉलर होता. आयपीएलच्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने 1.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. यंदाच्या मोसमात एखाद्या अनकॅप खेळाडूवर लागलेली ही दुसरी सगळ्यात मोठी बोली होती. जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यापर्यंतच्या सकारियाच्या प्रवासात अनेक अडथळे आले. 22 वर्षांचा डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या सकारियाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वडील टेम्पो ड्रायव्हरची नोकरी करत होते. घरात आर्थिक चणचण असताना क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करणं शक्यच नव्हतं, म्हणून त्याने बूक स्टॉलवर दोन वर्ष रोजंदारीवर काम केलं. भावाचे आणि वडिलांचे निधन या वर्षाच्या सुरूवातीलाच सकारिया सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali T-20 Trophy) खेळत होता, तेव्हाच त्याच्या भावाने गुजरातच्या भावनगरमध्ये आत्महत्या केली. सकारियाच्या कामगिरीवर याचा परिणाम होऊ नये, म्हणून त्याच्यापासून ही घटना लपवून ठेवण्यात आली होती. घरातल्या परिस्थितीची अजिबात कल्पना नसलेल्या सकारियाने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. आचरेकर सरांच्या आठवणीनं सचिन भावुक, VIDEO शेअर करत म्हणाला.. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर काही दिवसांनीच चेतनच्या वडिलांचे कोरोनानं निधन झालं. चेतनने टीम इंडियामध्ये झालेली निवड आपल्या वडिलांना समर्पित केली होती. ‘हे सगळं पाहण्यासाठी माझे वडील या जगात पाहिजे होते. मी भारतासाठी खेळावं, असं त्यांचं स्वप्न होतं. मला त्यांची खूप आठवण येत आहे. देवाने मागच्या एक वर्षात मला खूप चढ-उतार दाखवले. माझ्यासाठी हा प्रवास खूप भावुक होता. मी माझ्या छोट्या भावाला गमावलं, एका महिन्यानंतर मला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालं, पण मागच्याच महिन्यात वडील गेले. आता भारतीय टीममध्ये माझी निवड झाली.’ अशी भावुक प्रतिक्रिया चेतननं व्यक्त केली होती.