अहमदाबाद, 15 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मॅचचा इशान किशन (Ishan Kishan) हा हिरो होता. इशाननं याच मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण हा नवखेपणा त्याच्या खेळात जाणवला नाही. त्याने आक्रमक अर्धशतक केलं. तसंच कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सोबत 94 रनची निर्णायक भागिदारी देखील केली. इशाननं रविवारी खेळाबरोबरच त्याच्या कृतीमधूनही मन जिंकलं आहे. इशाननं 32 बॉलमध्ये 56 रनची खेळी केल्यानं त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी त्याने त्याचा हा पुरस्कार एका खास व्यक्तीला अर्पण केला. त्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालं आहे. इशान किशनच्या कोचच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. इशाननं हा पुरस्कार त्यांना अर्पण केला आहे. मॅचपूर्वी कोचने अर्धशतक झळकावण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण केल्याचं इशाननं सांगितलं. मुंबई इंडियन्सचा फायदा पहिल्या मॅचमध्ये खेळण्याचा अनुभव देखील इशानने यावेळी सांगितला. ‘पहिली मॅच खेळणं हे इतकं सोपं नाही. मला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये खूप काही शिकायला मिळालं. तिथं मी वरिष्ठ खेळाडूंसोबत राहिलो आहे. त्यांच्याकडून मला मोलाचं मार्गदर्शन मिळालं,’ असं इशानने सांगितलं. टॉम करनच्या बॉलवर सिक्स मारला तेव्हा मला लय सापडली असं वाटलं, असं इशान यावेळी म्हणाला. मात्र आपल्याला मॅच संपवता आली नाही याबद्दल त्याने खेद व्यक्त केला. ‘मी रिव्हर्स स्वीप चांगलं खेळतो, पण यावेळी ते जमलं नाही. मला मॅच संपवता आली नाही याचा खेद आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली. ( सूर्यकुमारनं कॅच सोडताच बदलले विराटच्या चेहऱ्यावरील हावभाव, VIDEO VIRAL ) पहिल्याच मॅचमध्ये विक्रम इशान किशनने त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये 32 बॉलमध्ये 56 रन केले. 175 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत इशानने 5 फोर आणि 4 सिक्स मारले. याचसोबत इशान किशनने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पदार्पणाच्या टी-20 मध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे. रहाणेने 2011 साली इंग्लंडविरुद्धच मॅन्चेस्टरमध्ये 61 रनची खेळी केली होती. यानंतर आता इशानने 56 रन केले.