चेन्नई, 16 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसरी टेस्ट भारतीय टीमनं 317 रननं दणदणीत जिंकली आहे. ऑल राऊंड कामगिरी करणारा आर. अश्विन या टेस्टचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. या मोठ्या विजयासह टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं आणखी एका विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटनं केली धोनीची बरोबरी विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया मागील चार टेस्टमध्ये पराभूत झाली होती. पराभवाची ही मालिका टीम इंडियानं तोडली. भारतानं चेन्नई टेस्ट जिंकताच विराट कोहलीनं टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतामध्ये सर्वात जास्त टेस्ट मॅच (21) जिंकण्याच्या धोनीच्या विक्रमाची विराटनं बरोबरी केली आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं मायदेशात 30 पैकी 21 टेस्ट मॅच जिंकल्या. तीन गमावल्या तर सहा ड्रॉ झाल्या. धोनीच्या यशाची टक्केवारी ही 70 टक्के आहे. विराटच्या यशाची टक्केवारी ही 77.8 टक्के इतकी आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं होम ग्राऊंडवर एकूण 28 टेस्ट खेळल्या असून यामध्ये फक्त दोन टेस्ट गमावल्या आहेत. तर पाच टेस्ट ड्रॉ केल्या आहेत.
भारताच्या यशस्वी कॅप्टनच्या यादीत धोनी आणि कोहली नंतर मोहम्मद अझहरुद्दीन (13) सौरव गांगुली (10) आणि सुनील गावसकर (7) टेस्ट विजय अशी क्रमवारी आहे.
यापूर्वी चेन्नईमध्ये सुरू असलेली दुसरी टेस्ट टीम इंडियानं 317 रननं दणदणीत जिंकली आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) 161 रन, आर. अश्विनचा (R. Ashwin) ऑल राऊंड खेळ आणि भारतीय स्पिनर्सची कमाल हे भारताच्या या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी भारताला ही टेस्ट जिंकणे आवश्यक होते. आता चार टेस्टच्या मालिकेत दोन्ही टीम 1-1 अशा बरोबरीत आहेत.