ब्रिस्बेन, 18 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथी आणि या मालिकेतील शेवटची टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) अर्धशतक झळकावलं. चौथ्या दिवशी लंचपूर्वी स्मिथ मैदानात सेट झाला होता. त्यावेळी रोहित शर्मानं (Rohit Sharma) स्मिथच्या एका कृतीची नक्कल केली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रोहितनं काय केलं? स्टीव्ह स्मिथ अनेकदा फिल्डिंग करत असताना मैदानात ‘शॅडो बॅटींग’ करताना दिसतो. सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टच्या दरम्यान देखील स्मिथनं शॅडो बॅटिंग केली होती. रोहित शर्मानंही त्याच पद्धतीनं शॅडो बॅटिंग केली. विशेष म्हणजे, रोहितनं स्मिथ क्रिजवर असतानाच शॅडो बॅटींग केली. स्मिथ रोहितची ही सर्व कृती पाहत होता.
स्टीव्ह स्मिथचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये स्मिथ ऋषभ पंतच्या पायांचे ठसे मिटवताना दिसला होता. भारतीय क्रिकेट फॅन्सनी या कृतीबद्दल स्मिथवर जोरदार टीका केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये झालेल्या बॉल टेम्परिंग प्रकरणाशी याची तुलना भारतीय फॅन्सनी केली होती. स्टीव्ह स्मिथनं या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लँगरनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
ब्रिस्बेनमध्ये पावसाचा अडथळा! ब्रिस्बेन टेस्टमध्ये हवामानाच्या अंदाजानुसार पावसाचा अडथळा आला आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 आऊट 243 अशी होती त्यावेळी मॅचमध्ये पावसाचा अडथळा आला. पावसामुळे लगेच टी ब्रेक घेण्यात आला आहे. चौथ्या दिवशी पावसापूर्वी झालेल्या खेळात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं सर्वात जास्त 55 रन काढले. तर डेव्हिड वॉर्नरनं 48 रन काढले. भारताकडून दुसऱ्या डावात आतापर्यंत मोहम्द सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या आहेत. तर वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली आहे.