मुंबई, 29 सप्टेंबर : आज जगभरात वर्ल्ड हार्ट डे (World Heart Day 2021) साजरा होत आहे. जगभरात हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण मोठं आहे. ऱ्हदयाच्या आजारासंबंधी जागृती करणे हा या खास दिवसाचा उद्देश आहे. त्याच दिवशी पाकिस्तानमधून या आजारासंबंधी नवीन बातमी आली आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकनं (Inzamam ul Haq) हार्ट अटॅक आल्याचं वृत्त फेटाळलं आहे. इंझमामला सोमवारी हार्ट अटॅकचा सौम्य झटका आला, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असं वृत्त पाकिस्तानच्या मीडियानं दिलं होतं. त्यानंतर क्रिकेट विश्वातून त्याच्या तब्येतीबाबत प्रार्थना करण्यात येत होती. मात्र इंझमामनं स्वत: हार्ट अटॅक आल्याचं वृत्त फेटाळलं आहे. नेमकं काय झालं होतं? इंझमामनं स्पष्ट केलं आहे की, ‘मला हार्ट अटॅक आला नव्हता. मी नियमित तपासणीसाठी डॉक्टरकडं गेलो होतो. त्यावेळी पोटामुळे माझी एंजियोप्लास्टी करण्यात आली. डॉक्टारांनी माझी एंजियोग्राफी करण्याचं ठरवलं होतं. पण सर्जरीच्या वेळी माझी एक धमनी ब्लॉक असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी त्रास कमी करण्यासाठी स्टेंट टाकण्याचं ठरवलं. ही एक सोपी सर्जरी होती, तसंच ती यशस्वी झाली आहे. 12 तासानंतर मी हॉस्पिटलमधून घरी परतलो आहे. मला आता चांगलं वाटत आहे. T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच, दिग्गज भारतीयाचा पत्ता कट पाकिस्तान मीडियानं दिलं होतं वृत्त यापूर्वी पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार इंझमामच्या छातीत तीन दिवसांपासून त्रास होत होता. सुरुवातीच्या तपासणीमध्ये तो बरा असल्याचं आढळलं. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा तपासणी केली त्यावेळी त्याला हार्ट अटॅक आल्याचं वृत्त पाकिस्तानच्या मीडियानं दिलं. त्यानंतर सचिन तेंडुलकरसह क्रिकेट विश्वातील सर्वांनी इंझमामची तब्येत चांगली व्हावी अशी प्रार्थना केली. पण, इंझमामनं आपल्याला हार्ट अटॅक आल्याचं मीडिया रिपोर्टमधून समजलं असं सांगितलं आहे.
2007 साली इंझमामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही, तो क्रिकेटपासून फारसा दूर गेला नाही. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संलग्न राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 2016 ते 2019 दरम्यान इंझमाम पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात संघ निवडप्रक्रियेचा प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे. तसेच तो अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.