इस्लामाबाद, 9 जून : पाकिस्तान सरकारनं भारतासोबत असलेल्या राजकीय तणावाची शिक्षा त्यांच्या नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान सरकारने (Imran Khan Government) पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेच्या थेट प्रसारणाबाबत भारतीय कंपन्यांशी करार करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. पाकिस्तान सरकारच्या बैठकीनंतर माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तान टेलिव्हिजनने (PTV) या प्रसारणाबाबत स्टार किंवा सोनीशी करार करण्याचा सरकारला आग्रह केला होता. ‘पाकिस्तान सरकारने इंग्लंड- पाकिस्तान क्रिकेट मालिका प्रसारणासाठी स्टार आणि सोनी टीव्हीशी करार करण्याचा आग्रह फेटाळला आहे. भारत सरकार जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार नाही, तोपर्यंत भारतासोबतचे आमचे संबंध सामान्य होणार नाहीत, हे इम्रान सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे,’ असे फवाद यांनी यावेळी सांगितले. PCB ला मोठा फटका ‘स्टार आणि सोनी यांच्याकडे दक्षिण आशियातील सर्व क्रिकेट प्रसारणाचे सर्व अधिकार आहेत. भारतीय कंपन्यांशी करार न करण्याची पाकिस्तान सरकारची भूमिका असल्याने या मालिकेचे पाकिस्तानमध्ये प्रसारण होणार नाही. याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड तसेच अन्य विदेशी प्रसारण कंपन्यांशी चर्चा करुन मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे पीटीव्ही आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, ’ असे फवाद यावेळी म्हणाले. ही ठरली क्रिकेट इतिहासातली सर्वोत्तम टेस्ट सीरिज, ICC ने केली घोषणा इंग्लंड सीरिजचा कार्यक्रम पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील 3 वन-डे आणि 3 टी20 मॅचची मालिका 8 जुलैपासून सुरू होणा्र आहे. पहिली वन-डे 8 जुलै रोजी कार्डिफमध्ये होईल. दुसरी वन-डे 10 जुलै रोजी लॉर्ड्सवर तर तिसरी वन-डे 13 जुलै रोजी बर्मिंगहॅम इथं होणार आहे. तर टी 20 मालिका 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान खेळली जाणार आहे.