मुंबई, 15 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) स्थानिक क्रिकेटपटूंच्या वेतनात वाढ करणार असल्याचं वृत्त आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च कौन्सिलची बैठक 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत खेळाडूंच्या मॅच फिसमध्ये 40 टक्के वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्य क्रिकेट बोर्डाच्या मदतीनं स्थानिक क्रिकेटपटूंना करारबद्धही करण्यात येऊ शकते. ‘स्पोर्ट्सस्टार’नं दिलेल्या वृत्तानुसार फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा पगावर वाढवून 50000 केला जाऊ शकतो. तर टी 20 मॅचसाठी खेळाडूंना 25000 रूपये मिळतील. सध्या खेळाडूंना रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीतील प्रत्येक मॅचसाठी 35000 रुपये मिळतात. तर सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक मॅचसाठी 17,500 मानधन दिले जाते. रिझर्व्ह खेळाडूंना मॅच फिसच्या 50 टक्के वेतन मिळते. सौरव गांगुली यांनी 2019 साली बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर केंद्रीय करार करण्याची घोषणा केली होती. त्याची आता अंमलबजावणी होण्याची चिन्हं आहेत. त्याचबरोबर महिला क्रिकेटपटूंनाही त्यांच्या मॅच फिसमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या महिला क्रिकेटपटूंना प्रत्येक वन-डे मॅचसाठी 12,500 रुपये तर टी20 साठी 6, 250 रुपये मानधन दिले जाते. महिला खेळाडूंच्या मॅच फिसमध्येही 25 ते 40 टक्के वाढ होण्याती शक्यता आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे रणजी ट्रॉफीचा मागील सिझन होऊ शकला नाही. त्यामुळे खेळाडूंना नुकसान भरपाई म्हणून मॅच फिसच्या किमान 50 टक्के रक्कम देण्यास सर्वोच्च कौन्सिल मंजुरी देणार आहे, अशी माहिती आहे. IPL 2021: ‘पहिल्या टप्प्यात आम्ही घाबरलो होतो,’ KKR च्या कोचचा गौप्यस्फोट ‘खेळाडूंना किमान 50 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी असं बीसीसीआयच्या बहुतेक सदस्यांचं मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) घेणार आहेत,’ अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली आहे.