ढाका, 12 जून : बांगलादेशचा ऑल राऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये शाकीबने केलेल्या गैरवर्तनाबाबत त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. शाकीब अंपायरच्या निर्णयावर इतका संतापला होता की त्याने एकदा नाही तर दोनदा स्वत:चे संतुलन गमावले. एकदा तर त्याने अंपायरच्या समोर तीन स्टंप उखडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणानंतर शाकीबने माफी मागितली. या सर्व गदारोळात शाकीबची बायको उम्मे अहमद शिशिर त्याच्या बचावासाठी पुढे आली आहे. हा सर्व आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध कट असल्याचा आरोप तिने केला आहे. शाकीबच्या पत्नीने फेसबुकवर तिचं मत मांडलं आहे. “या घटनेचा मीडिया प्रमाणे मी देखील आनंद घेत आहे. ज्यांना आजच्या घटनेचं चित्र स्पष्ट दिसतं, त्यांचा पाठिंबा मिळाल्यानं बरं वाटलं. किमान काही जणांमध्ये तरी या सर्वांच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत आहे.” शाकिबचा राग दाखवून मुख्य मुद्दा दाबला जात आहे, असा आरोप तिने केला.“मुख्य मुद्दा अंपायर्सच्या चुकीचा आहे. माझ्यासाठी हा सर्व शाकीबच्या विरुद्ध रचण्यात आलेला कट असून यामध्ये त्याला व्हिलन दाखवण्यात येत आहे.” असा दावा तिने केला.
काय आहे प्रकरण? शुक्रवारी ढाका प्रिमीयर लीग (DPL) चा 40 वा सामना मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब आणि अभानी लिमिटेड यांच्यात झाला, त्यावेळी अंपायरने टीमच्या बाजूने निर्णय दिला नाही, म्हणून शाकीब संतापला.
मोहम्मदने 20 ओव्हरमध्ये 145 रन केले, यानंतर आव्हानाचा बचाव करण्यासाठी शाकीब पाचव्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आला. मुशफिकुर रहीमने शाकीबला एक फोर आणि एक सिक्स मारून 10 रन काढले. त्या ओव्हरमध्ये शाकीबने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, पण अंपायरने मुशफीकुरला नॉट आऊट दिलं. अंपायरचा हा निर्णय ऐकून शाकीब संतापला आणि त्याने स्टम्प लाथ मारून उखडले. घडलेल्या प्रकारानंतर मोहम्मदन टीमचे खेळाडूही एकत्र आले आणि मैदानातला वाद आणखी वाढला. नॉन स्ट्रायकर एण्डला उभ्या असलेल्या नजमूल हुसेनलाही हा सगळा प्रकार पाहून धक्का बसला. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाकीब अल हसन पुन्हा एकदा अंपायरशी वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाकीबने अंपायरसमोर हातानेच स्टम्प उखडले आणि जोरात जमिनीवर फेकून दिले.
युवराजनं धुलाई केल्यानं धोक्यात आलं करियर! आता गाठली नवी उंची ढाका प्रिमीयर लीगमध्ये शाकीब खराब फॉर्ममध्ये आहे. पहिल्या 6 सामन्यांमध्ये त्याने 12.16 च्या सरासरीने 73 रन केले, यात तो दोन वेळा शून्य रनवर आऊट झाला. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही त्याने निराशाजनक कामगिरी केली.