ढाका, 16 जानेवारी : बांगलादेश प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आंद्रे रसेलनं वादळी खेळी केली. त्याने चट्टोग्राम चॅलेंजर्सच्या गोलंदाजांची धुलाई करत 22 चेंडूत 54 धावा कुटल्या. यातील 50 धावा त्याने फक्त चौकार-षटकार खेचून केल्या. रसेलने केलेल्या खेळीच्या जोरावर संघाने अशक्य वाटत असलेला विजय सहज मिळवला. या विजयासह अंतिम फेरीतही धडक मारली. आंद्रे रसेल मैदानात आला तेव्हा राजशाही रॉयल्सला 36 चेंडूत 83 धावा पाहिजे होत्या. रसेलने सुरुवातीला सावध खेळ करत 5 चेंडूत फक्त 2 धावा केल्या. त्यानंतर मात्र तुफान फटकेबाजी केली. 15 षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या षटकात एक चौकार आणि एक षटकारासह 19 धावा वसूल केल्या.
शेवटच्या 4 षटकात 54 धावांची गरज होती. 17 व्या षटकात 20 तर 18 व्या षटकात 6 धावा काढल्या. त्यानंतर पुढच्या 2 षटकात 31 धावा काढून राजशाही रॉयल्सने सामना खिशात घातला. रसेलने यातील एका षटकात 23 धावा काढल्या. यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. 20 व्या षटकात षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह त्यानं अर्धशतकही साजरं केलं. दरम्यान, त्याच्या या खेळीमुळे ख्रिस गेलची तुफान फटकेबाजी व्यर्थ गेली. गेलने चट्टोग्रामकडून खेळताना 24 चेंडूत 60 धावा केल्या. त्याने यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकार मारले. मात्र रसेलच्या खेळीने गेलचं वादळं लहानसं ठरवलं. विराट, रोहित आणि बुमराहची चांदी; तर धोनीला दररोज 2 लाखांचा फटका