Home Loan: घराच्या नुतनीकरणासाठीही मिळतं कर्ज! गृहकर्जाचे 'हे' प्रकार अनेकांना माहित नाहीत, वाचा संपूर्ण माहिती
मुंबई, 01 जुलै : स्वतःच्या मालकीचं घर (Buying own house) घेण्याचा निर्णय सोपा नसतो. त्यासाठी भरपूर खर्च येतो. कित्येकांची आयुष्यभराची कमाईदेखील यासाठी कमी पडते. असं असलं, तरीही आपलं स्वतःचं एक घर असावं हे स्वप्न जवळपास सर्व भारतीय पाहतात. स्वतःचं घर असल्यामुळे जी सुरक्षितता आणि स्थैर्य मिळतं, त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो. स्वतःचं घर घेताना जी भलीमोठी रक्कम आवश्यक असते ती बऱ्याच जणांच्या आवाक्यात नसते. त्यामुळे अनेक जण गृहकर्जाचा (Home loan) पर्याय अवलंबतात. घरामध्ये भरपूर पैसे गुंतवले जातात. त्यामुळे नवीन घर (रिसेल नव्हे) घेताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक ठरतं. घर घेणं हे नियामक (Regulatory), आर्थिक (Financial) आणि स्थानीय (Locational) बाबींशी निगडित आहेत. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, खरेदीदार अगदी निश्चिंतपणे आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. बँकबझार (BankBazaar.com) वेबसाइटचे सीईओ आदिल शेट्टी (Adhil Shetty) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. घर विकत घेताना हे पाच महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. परवडणं आणि परतफेड क्षमता गृहकर्जांमुळे स्वतःचं घर विकत घेणं हे सोपं आणि परवडणारं झालं आहे; मात्र घर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही स्वतःची आर्थिक स्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे. कर्जाचे हप्ते, घराचं डाउनपेमेंट या गोष्टी तुमच्या खिशाला परवडतात (Affordability) का, हे तपासणं आवश्यक आहे. घराची किंमत 100 रुपये असेल, तर टॅक्स आणि बाकी छुपे खर्च मिळून ती किंमत 120 ते 130 रुपयांपर्यंत जाते. यातला केवळ 75 ते 90 टक्के भाग गृहकर्जातून मिळतो. बाकी रक्कम आपल्याला स्वतःच्या खिशातून द्यावी लागते. हे वाचा - Property Tips: घर खरेदी करण्यापूर्वी ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रं नीट तपासा; फसवणूक होण्यापेक्षा सावध राहा मोठ्या प्रमाणात डाउनपेमेंट (Down Payment) केल्यास तुमच्या कर्जाची रक्कम आणि पर्यायाने तुमचा ईएमआय कमी होतो. एकंदरीत घराच्या 130 रुपयांपैकी 40 ते 50 रुपये तुम्हाला तुमच्या खिशातून भरावे लागतात. घर घेण्यापूर्वी हे पैसे तुमच्याकडे तयार आहेत याची खात्री करा. ही रक्कम जमा करण्यासाठी कित्येक पर्याय आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड किंवा एसआयपीमध्ये दरमहा 25 हजार रुपये गुंतवून, 12 टक्के व्याजदरावर तीन वर्षांमध्ये 10.9 लाख रुपये मिळवू शकता. गृहकर्ज देणाऱ्या संस्था तुमची परतफेड क्षमता (Repayment Capacity) तपासूनच तुमचं कर्ज सँक्शन करतील, मात्र तुम्हालाही तुमची परतफेड क्षमता लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमचा महिन्याचा खर्च सांभाळून तुम्हाला दरमहा ईएमआय (EMI) भरता यायला हवा. अर्थात, गरज पडल्यास तुम्ही तुमचा खर्च कमी करण्याचा प्रयत्नही करू शकता, जेणेकरून तुमचा ईएमआय बिनदिक्कत जात राहील. क्रेडिट स्कोअर तुम्ही गृहकर्ज घेणार असाल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) 750पेक्षा जास्त हवा. तुमचा क्रेडिट स्कोअर जेवढा जास्त असेल, तेवढीच तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. तुमच्या सध्या काही शॉर्ट टर्म ईएमआय (Short term EMI) सुरू असतील, तर ते लवकरात लवकर सेटल करण्याची गरज आहे. भरपूर ईएमआय असल्यामुळे तुमच्या परतफेड क्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होत जाते. रेरा आणि इतर कागदपत्रं तुम्ही जे घर विकत घेत आहात त्याची सर्व कागदपत्रं व्यवस्थित आहेत का हे तपासणं आवश्यक आहे. ती इमारत किंवा बंगला वैध असावा (Legal validity), तसंच स्थानिक प्रशासनाने त्याला एनओसी (Local Clearance) दिलेली असावी. ती इमारत किंवा घर रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी अर्थात ‘रेरा’कडे (RERA) नोंदणीकृत आहे का हे तपासणंही गरजेचं आहे. ‘रेरा’वर नोंद असलेली प्रॉपर्टी विकत घेतल्याने तुम्हाला प्रोजेक्ट रखडणं, चुकीचं बांधकाम अशा बऱ्याच गोष्टींबाबत दिलासा मिळतो. प्रॉपर्टीची कागदपत्रं (Property Documents) बरोबर असल्यास गृहकर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी होऊन जाते. टायटल डीड आणि एनक्रम्बन्स प्रमाणपत्र तुमचं नवीन घर निश्चित करण्यापूर्वी ज्या ठिकाणी तो प्रकल्प उभारला आहे, त्या जमिनीचं टायटल डीड तपासणं गरजेचं आहे. टायटल डीडमुळे (Title Deed) बिल्डरकडे असलेली प्रॉपर्टीची मालकी, मालकी विकण्याचा वा हस्तांतरित करण्याचा हक्क किंवा प्रॉपर्टी कोणत्या खटल्यात अडकली आहे का या गोष्टींबाबत तुम्हाला कल्पना मिळते. या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तुम्ही एखाद्या वकिलाची मदतही घेऊ शकता. हे वाचा - Real Estate Investment: प्रॉपर्टी खरेदी न करताही कमावा नियमित भाडे, कसं? त्याचप्रमाणे एनक्रम्बन्स सर्टिफिकेटही (Encumbrance Certificate) तपासणं आवश्यक आहे. गृहकर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला या सर्टिफिकेटची गरज भासते. प्रॉपर्टी कोणत्याही कायदेशीर समस्यांपासून मुक्त असल्याचा मुख्य पुरावाच हे सर्टिफिकेट असतं. ही सर्व कागदपत्रं नीट असतील, तरच ते घर घेण्याचा निर्णय पक्का करा. स्टँप ड्युटी आणि इतर चार्जेस तुम्हाला सांगण्यात आलेली घराची किंमत आणि खरोखरची किंमत यामध्ये बरीच तफावत असू शकते. घराची किंमत सांगताना बरेच छुपे चार्जेस (Hidden charges) सांगण्यात येत नाहीत; मात्र कागदपत्रांवर सही करताना हे चार्जेस बरोबर समोर येतात. त्यामुळेच अशा चार्जेसची माहिती पहिल्यापासून घेणं गरजेचं ठरतं. असं केल्यास तुम्हाला योग्य आर्थिक नियोजन करता येतं आणि ऐन वेळी बसणारा धक्का टाळता येतो. छुप्या चार्जेसमध्ये स्टँप ड्युटी (5-7 टक्के), रजिस्ट्रेशन फी (1-2 टक्के), मेन्टेनन्स चार्जेस, पार्किंग चार्जेस (Stamp Duty, Registration Fee, Maintenance and Parking Charges) यांचा समावेश होतो. सोबतच, बांधकाम सुरू असणाऱ्या घरांवर जीएसटीदेखील (GST) लागू होतो. परवडणाऱ्या घरांसाठी (45 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या) जीएसटी एक टक्का आहे, तर त्याहून जास्त किंमत असणाऱ्या घरांसाठी पाच टक्के जीएसटी द्यावा लागतो. तेव्हा आपल्या स्वप्नातलं घर विकत घेण्यापूर्वी या जादाच्या खर्चाचा विचार करणंही गरजेचं आहे. इतर काही महत्त्वाच्या गोष्टी नवं घर घेताना वरच्या पाच मुद्द्यांव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टी तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे, त्या घराचं वा इमारतीचं लोकेशन. तुमच्या घराजवळ शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानक, शॉपिंग मार्केट अशा गोष्टी असायला हव्यात. यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोयीच्या होतात. स्वतःचं घर घेण्याचं भाग्य बहुतांश व्यक्तींना एकदाच लाभतं. आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीची कमाई ज्या घरासाठी तुम्ही देणार आहात, ते घर सुरक्षितपणे आणि कोणत्याही अडचणींशिवाय घेता यावं यासाठी थोडी खबरदारी घेणं गरजेचं आहे. योग्य खबरदारी, योग्य आर्थिक नियोजन, थोडासा अभ्यास आणि योग्य परिश्रम यांची सांगड घातल्यास तुम्हीही तुमचं स्वप्न निश्चिंतपणे पूर्ण करू शकता.