लंडन, 24 नोव्हेंबर: फेसबुकने आपलं नाव बदलल्यापासून मेटाव्हर्सबद्दल (Metaverse) आपण ऐकून आहोत; मात्र हे मेटाव्हर्स फेसबुकने नाव बदलण्याच्या आधीपासून अस्तित्वात आहे. हे एक विशिष्ट ऑनलाइन एन्व्हायर्न्मेंट (Online environment) म्हणजेच आभासी वातावरण आहे, जिथे नागरिक व्हर्च्युअल जमीन खरेदी (Virtual property deal) करू शकतात, व्हर्च्युअल इमारतींमध्ये फिरू शकतात आणि व्हर्च्युअल अवतार (Virtual avatar) स्वरूपात दुसऱ्या लोकांना भेटूही शकतात. अशाच एका व्हर्च्युअल रिअल इस्टेटचा सौदा (Virtual real estate deal) सध्या चर्चेत आला आहे. टोकन्स ही क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक करणारी वेबसाइट आणि डीसेंट्रालँड (Decentraland) या मेटाव्हर्सने दिलेल्या माहितीनुसार, एका कंपनीने तब्बल 2.4 मिलियन डॉलर्सना व्हर्च्युअल जमीन (Virtual plot) विकत घेतली आहे. या कंपनीने क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पेमेंट केलं. डीसेंट्रालँड हे ब्लॉकचेनच्या माध्यमातून जमीन आणि इतर वस्तूंची नॉन फंजीबल टोकन (NFTs) स्वरूपात विक्री करते. ही एक प्रकारची क्रिप्टो संपत्तीच आहे. क्रिप्टोमध्ये व्यवहार करणाऱ्या व्यक्ती माना (MANA) या क्रिप्टोकरन्सीचा वापर करून या ठिकाणी जमीन विकत (Virtual land) घेतात. डीसेंट्रालँडच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी (23 नोव्हेंबर) सांगितलं, की टोकन्स डॉट कॉमची (Tokens.com) सहायक कंपनी असणाऱ्या मेटाव्हर्स ग्रुपने (Metaverse Group) 6,18,000 माना एवढी रक्कम देऊन व्हर्च्युअल जमीन खरेदी केली. म्हणजेच हा सौदा तब्बल 1 अब्ज, 78 कोटी, 67 लाख, 38 हजार 70 रुपयांना झाला. याबाबत ओपनसी या एनएफटी मार्केटप्लेसवर रजिस्ट्रेशनही करण्यात आलं. हे वाचा- 6 रुपयांचा शेअर पोहोचला ₹188 वर, एका वर्षात दिला 3000% रिटर्न डीसेंट्रालँडने दिलेल्या माहितीनुसार, हा आतापर्यंतचा सर्वांत महाग व्हर्च्युअल जमीन व्यवहार (Biggest virtual land deal) आहे. यापूर्वी जून महिन्यात डीसेंट्रालँडमधल्या जमिनीचा काही भाग 12,95,000 माना एवढ्या रकमेला विकला गेला होता; मात्र तेव्हा माना या क्रिप्टोकरन्सीची (MANA Value) किंमत आताच्या तुलनेत अगदीच कमी होती. त्यामुळे तेव्हा हा व्यवहार सुमारे 9 लाख 13 हजार डॉलर्समध्ये झाला होता. सध्या मेटाव्हर्स ग्रुपने घेतलेली व्हर्च्युअल जमीन ही 116 छोट्या छोट्या पार्सल्सपासून बनली आहे. यातलं प्रत्येक पार्सल 52.5 स्क्वेअरफूट आहे. म्हणजे ही एकूण जमीन 6090 स्क्वेअरफूट एवढी आहे. टोकन्सचे सीईओ अँड्र्यूज किगुएल यांनी याबाबत माहिती दिली. मेटाव्हर्स ग्रुपकडे आधीपासून असलेल्या रिअल इस्टेटला सहायक संपत्ती म्हणून ही खरेदी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. डीसेंट्रालँडच्या नकाशानुसार ही जमीन फॅशन स्ट्रीट परिसरात आहे. टोकन्सने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आधीपासून फॅशन शो आयोजित केले जातात. तसंच, व्हर्च्युअल रिअलिटीमधल्या अवतारांना विविध प्रकारचे व्हर्च्युअल कपडे विकण्यासाठी या ठिकाणी अनेक दुकानं आहेत. मेटाव्हर्स ग्रुपदेखील यासाठीच या जागेचा उपयोग करणार आहे. हे वाचा- काय आहे पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट दर? काही दिवसात भाव उतरण्याची शक्यता आधीपासून गेमिंग वर्ल्डमुळे लोकांचा व्हर्च्युअल रिअॅलिटीकडे कल वाढला होता. त्यातच कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर कित्येक जण घरबसल्या अशा मेटाव्हर्समध्येच फेरफटका मारणं, राहणं पसंत करू लागले होते. त्यामुळेच व्हर्च्युअल जगालाही आता मोठ्या कंपन्या अधिक गांभीर्याने घेऊ लागल्या आहेत.