अपक्ष उमेदवारांची प्रेमी युगुलांसाठी आश्वासनांची खैरात
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, 14 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने दिग्गज नेते प्रचारात उतरवले आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवारांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केलेला प्रचार सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. अपक्ष उमेदवारांचं तरुणांना आश्वासन आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणांनाच राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना प्रेम करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे कायदे करण्याचं आश्वासन चिंचवड विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी दिलं आहे. आज व्हॅलेंटाईन डेचं औचीत्य साधून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी एकमेकांना गुलाब पुष्प देत अनोख्या पद्धतीने राजकीय व्हॅलेंटाईन डे साजरा केला. एकमेकांवर खालच्या पातळीची टीका करत प्रचार करणाऱ्या राजकीय पक्षातील उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी केलेल्या या उपक्रमाची चर्चा सर्वत्र होती. वाचा - Karuna Munde Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांना हटवा, करुणा मुंडेंची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी वैचारिक मतभेद असू शकतात. मात्र, सध्या आपल्या देशात द्वेशापेक्षा प्रेमाची पेरणी होणं अधिक गरजेचं असल्याचं मत या उमेदवारांनी व्यक्त केलं. आपण निवडून आलो तर प्रेमविवाह करणाऱ्या तरुणांना राजकारणात उमेदवारी देण्यासंदर्भातील कायदा करू. तरुणांना प्रेम करण्यापासून कुठलाहीही जाती, धर्म, रोखू शकणार नाही, असे कायदे करणार असल्याचं आश्वासन या उमेदवारांकडून देण्यात आलं आहे. अर्थातच हा उपक्रम त्यांच्या प्रचाराचा भागही असू शकतो. मात्र, जे इतर मोठ्या पक्षातील नेत्यांना जमलं नाही ते या अपक्ष उमेदवारांनी केल्यामुळे हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.
चिंचवडमध्ये तिरंगी लढत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. शिवसेनेच्या नेत्यांकडून कलाटे यांची मनधरणी करण्यात आली. त्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर त्याचबरोबर सुभाष देसाई हे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांच्याकडे गेले होते. शिवसेनेच्या नेत्यांनी कलाटे यांची भेट घेऊन समजूत काढली. पण, कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही. कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे. मात्र, या तिरंगी लढतीमुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारास होऊ शकतो असं मत राजकीय विश्लेषकाकडून व्यक्त केला जातंय.