शिवानी धुमाळ, प्रतिनिधी पुणे, 14 जून: संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी सहभागी झाले आहेत. सर्वजण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला हरिनाम घोष करत निघाले आहेत. या वारीमध्ये मूळच्या सांगली जिल्ह्यातील सुमन पाटील या देखील दाखल झाल्या आहेत. सुमन पाटील या 40 वर्षांपासून न चुकता पायी वारी करत आहेत. 40 वर्षांपासून न चुकता पायी वारी 65 वर्षीय सुमन पाटील या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील पारगाव या गावच्या आहेत. वयाच्या 25 वर्षांपासून त्यांना माऊलींच्या पायी वारीचा नाद लागला आणि तेव्हापासून त्या पंढरपूर वारीत सहभागी होत असतात. कसलंही शालेय शिक्षण नसताना त्यांना भजन, हरिपाठ, किर्तन हे सगळं अगदी उत्तम जमतं. सुमन या मागील 40 वर्षांपासून न चुकता पायी वारी करत आहेत.
पायी वारीतून आनंद मिळतो वारी हे संस्काराचं विद्यापीठ आहे. गेल्या 40 वर्षांपासून वारी करत असून मला कुठल्याही शारीरिक व्याधी नाहीत. दरवर्षी मला पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते. एवढ्या लांबच्या प्रवासासाठी मला घरचे विरोध करतात. परंतु तरीही त्यांच्या विरोधाला न जुमानता मी वारीत सहभागी होत असल्याचं सुमन यांनी सांगितले.
Pune News : अन् वारकऱ्यांनी पाहिलं नाटक, घरातलं वास्तव डोळ्यासमोर पाहून झाले सगळे स्तब्ध VIDEO
तसेच दरवर्षी मी वारीची आतुरतेने वाट बघते ते सांगत असताना त्यांना अगदी भरून आलं. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत वारी करणार आणि पांडुरंगाचे नामस्मरण करणार, असं सुमन पाटील यांनी सांगितलं.