पुणे, 12 जुलै : सध्या सर्वत्र पावसाला सुरूवात झालीय. पावसामुळे वातावरणात बदल झाला असून सर्वजण मूड फ्रेश करण्यासाठी सहलीचं प्लॅनिंग करत आहेत. पुण्याजवळ एक दिवसाच्या सहलीसाठी अनेक ठिकाणं आहेत. यापैकी एका खास ठिकाणाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर रामदारा हे निसर्गरम्य ठिकाण आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं, अशी कथा सांगितली जाते. एका तळ्याच्या मधोमध रामदऱ्याचं मंदिर आहे. भाविकांना मंदिरात जाता यावं, यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे. महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या आणि दुकानांनी गराडा घातलेला असतो, तसा या मंदिराभोवती नाही.
प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाच्या परिसर झाडं तसंच लता-पल्लवांनी सुशोभित झाला आहे. तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारी बदकंही आहेत. काही झाडांभोवती बसण्यासाठी पार बांधले आहेत. या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं. शिवकालात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली. त्यानंतर थेट 1970मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला. मंदिरात महादेवाची पिंड आहे. हे मूळचं महादेवाचं मंदिर असून सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम-लक्ष्मण आणि सीता, तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज ऊर्फ धुंदीबाबांचा फार मोठा सहभाग होता. मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम आहे. मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे वेगवेगळ्या पक्ष्यांचाही इथं राबता असतो.मंदिराच्या भिंतींवर संतांच्या मूर्ती आहेत.भगवान शंकर तांडवनृत्य करत असलेलेही एक शिल्प आहे. मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमानाची मूर्ती आहे. 800 रुपयांपासून करा रुम बूक, पुण्यातील 10 स्वस्त आणि मस्त हॉटेल्स कसं जालं? पुणे- सोलापूर महामार्गानं लोणी काळभोर गावातून उजवीकडं एक छोटा रस्ता गेला आहे. या रस्त्यानं 5 ते 6 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे . स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन खात्याच्या बस आणि पीएमपीएमलच्या बसही मिळू शकतात. बसनं आल्यास रामदऱ्याकडे रिक्षानं जावं लागतं.