पुणे, 15 जुलै : राजीव गांधी उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी तनुश्री भोसले ही काही दिवसांपूर्वी शुभम भोसले होती. पण पुढचं आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचं तिनं ठरवलं आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून ती पुरुषाची स्त्री बनली. पण पुढे नोकरीचं काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिचा हा प्रश्न पुणे महापालिकेने सोडवलाय. पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून तृतीयपंथीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळावे यासाठी त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. ‘पुणे महानगरपालिकेने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आम्हाला मदत होत आहे. माझे काम पाहून घरचेही मला आता बोलत आहेत,’ अशी भावना या निर्णयामुळे आनंदी झालेल्या तनुश्रीनं व्यक्त केल्या आहेत.
महापालिका कार्यालयाच्या आवारामध्ये नागरिकांची गर्दी पाहता आणि लोकांचा वावर पाहता, सुरक्षा रक्षक म्हणून दहा तृतीयपंथीयांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुरक्षा विभागात 25 तृतीयपंथी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलं जाणार आहे, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिलीय. पुण्यातील वेगवेगळ्या भागातील ट्रान्सजेंडरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि एक चांगलं स्थान मिळावं या दृष्टिकोनातून हा एक विषय सुरू करण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्तांनीही या निर्णयाला मान्यता दिलीय, असं त्यांनी स्पष्ट केलं. IAS अधिकाऱ्यानं मुलाला का टाकलं सरकारी अंगणवाडीत? INSIDE STORY कशी होते निवड? तृतीयपंथीयांची उंची, त्यांचे वय त्याचप्रमाणे त्यांची तब्येत चांगली हवी. पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यासाठी त्या तृतीयपंथीयावर कोणतेही गुन्हे नसावेत. या भरतीपूर्वी पोलिसांकडून त्यांचा रेकॉर्ड तपासला जातो. यामध्ये साधारण गोष्टींचा समावेश आहे. पोलीस भरतीप्रमाणे सराव चाचणी घेतली जात नाही, असं जगताप यांनी स्पष्ट केलं.