उद्धव ठाकरे, नाना पटोले
पुणे, 10 जानेवारी : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले आहेत. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी या दोन जागांसाठी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आज दुपारी तीनपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र त्याचपूर्वी महाविकास आघाडीकडून दोन्ही मतदारसंघात प्रचाराचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे. काय आहे मविआच्या प्रचाराचं प्लॅनिंग? पुण्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाकडून प्लॅनिंग करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांचा पुण्यात रोड शो होणार आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. ठाकरे गटांच्या नेत्यांप्रमाणेच महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या देखील पुण्यात आणि चिंचवडमध्ये सभा होणार आहेत. हेही वाचा : Chinchwad by-election : उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार पण..; राहुल कलाटेंच्या अटीमुळे ‘मविआ’ अडचणीत चिंचवडमध्ये बंडखोरीचा फटका आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र चिंचवड मतदारसंघात बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे. राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही कलाटे हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यानं या बंडखोरीचा मोठा फटका चिंचवडमध्ये ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.