चंद्रकांत फुंदे आणि वैभव सोनवणे पुणे, 2 मार्च : कसबा विधानसभेची जागा कोण जिंकणार याबाबत संपूर्ण राज्यभरात उत्कंठा होती. भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जात असल्यानं भाजपसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची होती. तर महाविकास आघाडीला राज्यातल्या सत्ताबदलानंतर आपली ताकद दाखवून देण्याची संधी होती, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. भाजपनं सर्व ताकद लावूनही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड दिली. भाजपच्या हेमंत रासनेंना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी पराभूत केलं. कसब्यातील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण या पोटनिवडणुकीत भाजपनं मंत्री आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची मोठी फौज उतरवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शर्थीचे प्रयत्न केले होते, मात्र एवढं करुनही भाजपला आपला पराभव रोखता आला नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचा हा बालेकिल्ला ध्वस्त केला. काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे या पोट निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. कारण जनतेशी तगडा जनसंपर्क ही धंगेकरांची सर्वात मोठी जमेची बाजू मानली जात होती. नगरसेवक म्हणून काम करताना सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख बनली होती. जनतेत सहज मिसळण्याचा त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या विषयी आपुलकी असणारा मोठा वर्ग कसबा मतदारसंघात आहे. आणि त्याचं मतदारांनी धंगेकरांना मदतीचा हात दिल्यामुळे त्यांचा विजय झाला. धंगेकरांच्या तुलनेत भाजपच्या हेमंत रासनेंचा जनसंपर्क कमी पडला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची आपल्या पारंपरीक मतदारांवर सगळी दारोमदार होती. कसब्यात काँग्रेसचं विजयाचं महत्वाचं कारण म्हणजे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांची केलेली निवड. रवींद्र धंगेकरांशिवाय महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार असता तर ही निवडणूक जिंकणे जवळपास अशक्य होते. काँग्रेसने हा विजय मिळवला याचे मोठे श्रेय रवींद्र धंगेकरांना स्वत:ला आहे. अत्यंत तगडा जनसंपर्क असलेला उमेदवार ही धंगेकरांची सर्वात जमेची बाजू. नगरसेवक म्हणून काम करत असताना कायम लोकांसाठी उपलब्ध असणे. धंगेकरांचा जितका जनसंपर्क आहे तितका रासनेंचा नव्हता. काँग्रेसच्या विजयाचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे महाविकास आघाडीने दाखवलेली एकी. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला ही जागा गेल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटानं अगदी एकदिलानं ही उमेदवारी स्वीकारल्यामुळे धंगेकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. एरवी महाविकास आघाडीतील धुसफूस किंवा बेदिली वेळोवेळी दिसून आली आहे. पण या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध दिसली. काँग्रेस नेत्यांसोबतच अजित पवार, आदित्य ठाकरे हे नेतेही हिरिरीने प्रचारात उतरले. तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आली आणि त्याचा थेट फायदा धंगेकरांना झाला. महाविकास आघाडीतील पक्षांसाठी ही शिकवण आहे की एकसंध राहिल्यास निवडणुकीत यश मिळू शकते.