पुणे, 10 ऑक्टोबर: काल सायंकाळी सहा वाजल्यानंतर पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी (Heavy rainfall in pune) लावली आहे. तासभर पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शहरातील अनेक ठिकाणांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. कमी वेळात पडलेल्या जास्त पावसामुळे शहरातील रस्ते दुथडी भरून वाहत होते. रस्त्यांवरून गुडघाभर पाणी वाहत असल्याने अनेक रस्त्यांना नदीचं रुप आलं होतं. यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत होऊन अनेक ठिकाणी कोंडी (Traffic jam) झाली होती. अचानक कोसळलेल्या या धुव्वाधार पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची दाणादाण उडाली होती. पुण्यातील कात्रज, कोंढवा, स्वारगेट, गोकुळ नगर, साई नगर, भारती विद्यापीठ भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर केशव नगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, खराडी आणि नगररोड आदी परिसर जलमय झाला आहे. रस्ते दुथडी भरून वाहत असल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. भाजीविक्रेत्यांसह खरेदीदार आणि घराबाहेर फिरायला आलेल्या नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली. हेही वाचा- राज्यात तीव्र पावसाचे ढग; पुढील 3 तासांत पुण्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस गेल्या आठवडाभरात झालेल्या धुव्वाधार पावसाने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी केली होती. पण काल सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान लोहगाव, धानोरी रोड, लक्ष्मी नगर या परिसराला देखील पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. यावेळी महाराष्ट्र पोलीस विमानतळ वाहतूक विभाग पुणे शाखेचे सुजित वसंतराव वाघमारे यांनी भर पावसात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावताना दिसले. ते सामान्य लोकांना सुरक्षित स्थळी घेऊत जात होते. त्यांचा एक व्हिडीओ देखील समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहे.
ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. घरात पाणी शिरल्याने दैनंदिन वापरातील अनेक वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. तसेच महागड्या वस्तूमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं लाखोंच नुकसान झालं आहे. तसेच पार्किंगमध्ये आणि रस्त्यावर उभी केलेली वाहनं देखील पाण्याखाली गेली आहे. कालच्या पावसाची विदारक दृश्य सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहेत.