मूर्ती बनवताना व विक्रीसाठीही स्वच्छता व सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे.
पुण्यातील एक नावाजलेली संस्था असलेल्या 'हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट' अर्थात हातकागद संस्थेतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शाडूची माती व कागदी लगद्यापासून बनलेली मजबूत व आकर्षक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा उपक्रम हातकागद संस्थेबरोबरच पेणच्या गणेशमूर्ती कारागिरांना देखील उभारी देणारा ठरेल.
पुण्यात 'हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट'ने 80 वर्षांहून अधिक काळापासून आपले वेगळे स्थान जपले आहे. मधल्याकाळात संस्था बंद असली तरी, आता नव्या जोमाने तोच वारसा जपण्यास सज्ज झाली आहे.
जुनी परंपरा व नवा सर्जनशील दृष्टीकोन यांचा मेळ साधत आता ही संस्था कार्यरत आहे. हस्तोद्योग, शाश्वत व पुनर्वापर या तत्त्वावर आधारित या गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत.
यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती, म्हैसुरी, पद्मासनातील, पेशवाई, चौरंगावरील अशा विविध प्रकारातील, आकर्षक रंगसंगतीत व विविध उंचीच्या गणेशमूर्ती कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर जवळील हातकागद संस्थेच्या दालनात उपलब्ध आहेत.
सर्व मूर्ती शाडूची माती व कागदी लगदा यांच्या मिश्रणातून बनविण्यात आल्या असल्याने त्या 100 टक्के पर्यावरणपूरक व मजबूत आहेत. मूर्ती बनवताना व विक्रीसाठीही स्वच्छता व सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे.
गणेशभक्तांना व्हिडीओ कॉलद्वारे मूर्ती विषयीचे शंकानिरसन करून मूर्ती निवडता येणार आहे. या बरोबरच मूर्ती घरपोच देण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.
इच्छुकांना प्रत्यक्ष इन्स्टिट्यूटला जाऊन देखील मूर्ती खरेदी करणे शक्य आहे. येथे पर्यावरणपूरक मूर्तीबरोबरच पर्यावरणपूरक मखर देखील उपलब्ध आहेत.
आकर्षक, टिकावू व घडी घालून पुन्हा वापरता येण्यासारखे मखर विशेष लक्षवेधी ठरत आहेत. याशिवाय अन्य सजावटीचे पर्यावरणपूरक साहित्य देखील येथे उपलब्ध आहे.