मुंबई, 12 ऑक्टोंबर : जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. होत असलेल्या परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान मध्य भारतातून मान्सूनच्या माघारी परतण्यासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून बोलले जात आहे. आज (ता. 12) उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
याचबरोबर हवामान विभागाने विजांसह पावसाचा काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढणार आहे.
हे ही वाचा : यंदा वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीत, सण-उत्सवावर काय होणार परिणाम?
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची स्थिती आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर भागात पावसाचा जोर असल्याची हवामान विभागाने माहिती दिली.
पोषक हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे मंगळवारी उन्हाचा चटका काहीसा कमी झाला होता. आज (ता. 12) उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हे ही वाचा : Weather Forecast: पावसाच्या परतीचा मुहूर्त लांबला; पुणे, मुंबईसह या जिल्ह्यांना झोडपणार
मान्सूनच्या माघारीस पोषक स्थिती
मान्सून वायव्य भारतातून 3 ऑक्टोबर रोजी परतल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. परतीच्या वाटचालीत मान्सूनची उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा तब्बल आठवड्यानंतरही मंगळवारी (ता. 11) कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मान्सून गायब होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
बंगालच्या उपसागरात मध्यवर्ती भागावर असलेल्या हवेच्या दाबामुळे 10 ते12 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत हवेच्या दाबाचा हा पट्टा पश्चिम किंवा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे. हा पट्टा दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि आसपासच्या भागातून पुढे जाऊ शकतो.