मुंबई, 11 जानेवारी : सध्या भारतीय क्रिकेट विश्वात भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेसोबतच रणजी ट्रॉफी सामने देखील खेळले जात आहेत. श्रीलंका विरुद्ध टी 20 मालिकेतील दुसरा सामना हा पुण्यात खेळला गेला होता. त्यावेळी पुणे हे ऋतुराज गायकवाडचे होम ग्राउंड असूनही त्याला संघातून बाहेरच ठेवण्यात आले. परंतु रणजी सामन्यात ऋतुराजने पुन्हा एकदा त्याची प्रतिभा सिद्ध केली आहे. रणजी ट्रॉफीच्या एलिट विभागातील ब गटाच्या तमिळनाडूविरुद्ध खेळत असलेल्या सामन्यात ऋतुराजने दमदार शतक ठोकले. महाराष्ट्र विरुद्ध तमिळनाडू यांच्यातील रणजी सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सिद्धेश वीर आणि राहुल त्रिपाठी यांच्याकडून संघाला निराशा झाली. केदारने आपली 56 धावांची खेळी 5 चौकार आणि 2 षटकारांनी सजवली. 45 धावांची खेळी करणाऱ्या अंकित बावणेला संदीप वॉरियर याने बाद केले.
हे ही वाचा : IPL 2023 : रिषभ पंत IPL 2023 खेळणार की नाही? सौरव गांगुली यांनी दिलं उत्तर
रणजी ट्रॉफीच्या सामन्यात ऋतुराजने दमदार शतक ठोकले.
पण ॠतुराज गायकवाड आणि अझीम काझी या जोडीने 142 धावांची नाबाद भागीदारी करताना महाराष्ट्राचा डाव सावरला. ऋतुराजने 126 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 118 धावांची खेळी केली. अझीमने 119 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 चौकारांनी नाबाद 87 धावांची खेळी साकारली. ऋतुराज गायकवाडची दमदार शतकी खेळी आणि केदार जाधव, अझीम काझी यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर महाराष्ट्र तमिळनाडू विरुद्धच्या लढतीत दिवसअखेरीस 6 बाद 350 धावा करण्यात यशस्वी ठरला. ऋतुराज गायकवाडे यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असताना एका ओव्हरमध्ये 7 षटकार लगावून अनोखा विक्रम आपल्या नावे केला होता.