नाशिक, 20 एप्रिल: नाशिकमधील झाकीर हुसेन या महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास ऑक्सिजन टँक लीक झाल्याचं वृत्त समोर आलं. धक्कादायक म्हणजे या दुर्घटनेत ऑक्सिजनअभावी तब्बल 22 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेनंतर मृतक रुग्णाच्या नातेवाईकाने एक दावा केला आहे ज्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयात मृत झालेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाने न्यूज18 लोकमतला सांगितलं की, आमचा माणूस गेला आहे. काल ऑक्सिजन लेवल 84 होती आज सकाळी आम्हाला कॉल येतो आणि सांगतात तुमचा रुग्ण क्रिटिकल आहे वर रुग्णालयात जाऊन पाहिलं तर ऑक्सिजन नव्हता. ऑक्सिजन पुरवठाच नव्हता. त्यानंतर 5-10 मिनिटांत ऑक्सिजन लीक झाला. रुग्णालयात ऑक्सिजनच नव्हता आणि त्यानंतर टँक लीक झाला. वाचा: Nashik Oxygen Leak: अर्धा तास खंडित होता ऑक्सिजन पुरवठा, 22 रुग्ण दगावल्याची माहिती या नातेवाईकाने सांगितलं की, “रुग्णालयात ऑक्सिजनच नव्हता. मी संपूर्ण रुग्णालयात तपासले पण ऑक्सिजन कुठेच मला मिळाला नाही. वर डॉक्टरांना विचारले तर ते म्हणाले खाली जाऊन डॉक्टरांना विचारा मग खाली आलो तर ते म्हणाले वर डॉक्टरांना विचारा. नंतर लक्षात आलं की यांच्याकडे शून्य ऑक्सिजन होता. आज जे रुग्ण दगावले आहेत याची जबाबदारी कोण घेणार?” नाशिक मनपा आयुक्तांनी माहिती दिली की, झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते त्यापैकी 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या प्रकणरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल. या घटनेत 10 ते 12 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती द्यांनी दिली होती. मात्र, आता आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील 22 रुग्णांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.