(फोटो-नासाच्या व्हिडिओतील स्क्रीनग्रॅब)
नवी दिल्ली, 19 एप्रिल : मंगल ग्रहावर (Mars) जीवन आणि पाण्याच्या शोधासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासातर्फे (NASA) सध्या एक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला सोमवारी एक मोठं यश हाती लागलं आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पर्सिव्हरन्स रोव्हरच्या माध्यमातून मंगळ ग्रहावर पाठवलेल्या इनजेन्युटी (Ingenuity) हेलिकॉप्टरने (Mars Helicopter) मंगळ ग्रहावर पहिलं यशस्वी उड्डाण घेतलं आहे. प्रथमच अशाप्रकारे एखाद्या ग्रहावर हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं आहे. नासानं याचा व्हिडिओदेखिल प्रसिद्ध केला आहे. (वाचा- Ice Cream ची निर्मिती कशी झाली? पाहा थंडगार पदार्थाचा रंजक प्रवास ) मंगळ ग्रहावर नासाच्या इनजेन्यूटी हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे लाईव्ह प्रक्षेपणदेखिल नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या माध्यमातून करण्यात आलं. नासानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये इनजेन्यूटी हेलीकॉप्टर काही सेकंदांसाठी मंगळ ग्रहावर उड्डाण घेत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
हेलीकॉप्टरनं उड्डाण घेताच संपूर्ण लॅबमध्ये टाळ्यांचा आवाज घुमला. या यशामुळं शास्त्रज्ञांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाल्याचं यात पाहायला मिळालं.
लाल ग्रह अशी ओळख असलेल्या मंगळ ग्रहावर नासानं यशस्वीरित्या हेलिकॉप्टर उड्डाण पूर्ण केल्यानंतर मार्स हेलिकॉप्टर प्रोजेक्टच्या मॅनेजर मीमी ऑन्ग यांनी नासाच्या संपूर्ण टीमला शुबेच्छा दिल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची टीम या मोहिमेसाठी जवळपास सहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत होती.