मुंबई, 26 ऑक्टोबर : बीएमसीतील बंडखोर नगरसेवकांविरोधात मनसेनं व्हीप जारी केलाय. मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना हा पक्षादेश बंधनकारक असणार आहे, या बंडखोर नगरसेवकांची अद्याप स्वतंत्र गटनोंदणी पूर्ण झाली नसल्याने ते मनसेचे नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांना पक्षप्रमुखांचा पक्षादेश बंधनकारक आहे. तसंच त्यांनी महापालिकेतील कोणत्याही सभेत मतदान करु नये. पक्षादेशाविरोधात जाऊन त्यांनी मतदान केल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. असा इशाराच या पत्राद्वारे देण्यात आलाय.
दरम्यान, या व्हिपनंतरही मनसेचे बंडखोर नगरसेवक दिलीप लांडे हे आज शिवसेनेच्या कार्यक्रमात जाहीरपणे सहभागी झाले होते. कुर्ला पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या भूयारी मार्गाचं आज युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालंय. या भूयारी मार्गामुळे रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना पूर्व-पश्चिम येण्या-जाण्यासाठी सोईचं ठरणार आहे. मात्र या लोकार्पण कार्यक्रामात सर्वांचं लक्ष होतं ते मनसेतून शिवसनेत आलेले नगरसेवक दिलीप लांडे यांच्याकडे. या लोकार्पण कार्यक्रमात दिलीप लांडे युवासेना प्रमुख महापौर, उपमहापौर आणि शिवसेना आमदारांसह पहिल्या रांगेत बसले होते. त्यामुळे मनसे या बंडखोर नगरसेवकांवर खरंच कारवाई करणार हा हेच पाहायचं आहे.