16 सप्टेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील राजकारणानं आज एक वेगळं आणि रोमांचक वळणं घेतलंय. माझगाव क्रिकेट असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य बनले आहेत. ही जागा याअगोदर एमसीएचे माजी अध्यक्ष दिवंगत विलासराव देशमुख यांची होती. त्या जागेवरून आता मुख्यमंत्री एमसीएमध्ये दाखल झाले आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगतेय. एमसीए अध्यक्षपदाच्या शर्यतीत याअगोदरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार उतरलेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी अगोदर एमसीएची निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलं होतं. यासाठी कारण असे होते की, एमसीएच्या निवडणुकीसाठी उमेदवार हा मुंबईतील रहिवासी असणं गरजेचं आहे. आणि शरद पवारांचा पत्ता होता बारामतीचा. पण यासाठी शरद पवार यांनी आपला ‘मुक्काम पोस्ट’ मुंबई करून घेतला आणि एमसीएच्या निवडणुकीत उतरणार अशी ‘गुगली’ टाकली. आता राजकीय आखाड्यात एकमेकांच्या आजुबाजूला बसून राजकारण करणारे दोन दिग्गज नेते एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटच्या ग्राऊंडवर आता मुख्यमंत्री आणि पवार आमने-सामने येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय