मुंबई, 11 फेब्रुवारी: एखादा सर्वसामान्य माणूस रेस्टॉरंटला भेट दिल्यावर पहिली गोष्ट काय करतो? तर तो त्याच्या बजेटमध्ये सर्वांत चांगलं काय मिळेल, यासाठी मेनू कार्ड पूर्ण बघतो. पदार्थांची लिस्ट बघत असतानाच तो त्याच्या किमती किती आहेत, हेही बघत असतो. स्टार्टर असो किंवा ड्रिंक त्याच्यासाठी किंमत महत्त्वाची असते. जेवणच आणि दारूच्या किमतीहीसध्या खूप वाढल्या आहेत; पण सोशल मीडियावर एक बिल व्हायरल होतंय, त्यात मद्याच्या किमती इतक्या कमी आहेत, की कोणीही चक्रावून जाईल. ते बिल इंडियन नेव्हीच्या मेसमधलं आहे. नेव्ही ऑफिसर्सच्या मेसमध्ये मद्य अत्यंत कमी किमतीत विकलं जातं. या किमती पाहिल्यावर तेच मद्य मार्केटमध्ये महाग दराने खरेदी करणाऱ्यांना नक्कीच धक्का बसेल. अनंत नावाच्या एका ट्विटर युजरने नेव्ही ऑफिसर्स मेसमधल्या बिलाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात व्हिस्की आणि बिअरचे असंख्य ब्रँड खूपच कमी किमतीत विकले जात असल्याचं दिसतंय. “माझा बेंगळुरूचा मेंदू या किमती समजू शकत नाही,” असं त्याने हा फोटो शेअर करताना लिहिलंयय. बेंगळुरूमध्ये या किमती खूपच जास्त आहेत. त्यामुळे त्याला एवढ्या कमी किमती पाहून धक्का बसला आहे, त्या अर्थाने त्याने ती कॅप्शन दिली आहे. आता तुम्हीही विचार करत असाल की मद्य तिथे इतकं स्वस्त कसं विकलं जातं. नेव्ही ऑफिसर्स हे केंद्र सरकारचे अधिकारी असतात. त्यामुळे त्यांना केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्यात येते. म्हणूनच आर्मी कॅन्टीनमध्ये मद्य आणि किराणा सामान किमान 10 ते 15 टक्के स्वस्त असतं. अनंतने हे बिल सोशल मीडियावर शेअर केल्यावर अनेकांना विश्वासच बसला नाही. त्यांना किमतीतला हा फरक पचवणं खूपच अवघड गेलं. अनेकांनी अनंतच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. “भावा तू या किमती कुठे आणि केव्हा पाहिल्यास?” असं एका युझरने विचारलं. दुसऱ्याने “हाहाहाहा… हा DSOI मेनूसारखा दिसतोय. इथे आम्हाला बेंगळुरूमध्ये 500 रुपयांत किंगफिशर मिळते,” अशी कमेंट केली. या वेळी एका युझरने त्याचा अनुभव सांगितला. त्याने सांगितलं की, तो एकदा एका फौजी मित्राबरोबर मुंबईच्या रेग्युलर बार आणि रेस्टॉरंटमध्ये दारू प्यायला गेला होता. त्यानंतर किंमत पाहून त्याने विचारलं, की हा दर एमएलचा आहे की रुपयांचा? मी रुपये म्हणताच त्याला धक्का बसला होता, असं तो म्हणाला.