2022चं वर्ष उत्तमरित्या सुरू झालं पण पुढच्या 5 महिन्यात संगीतसृष्टीवर मोठी शोककळा पसरली. एकामागून एक प्रसिद्ध लाडक्या गायकांनी प्रेक्षकांना अलविदा म्हटलं. संगीतविश्वातील एकामागून एक सात तारे निखळले. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) पासून सिद्धू मूसेवाला (Siddhu moosewala) आणि आता केके (KK) पर्यंत अनेक ज्येष्ठ आणि तरुण गायकांनी आपल्याला अलविदा म्हटलं. कोण आहेत गायक संगीतकार जाणून घ्या.
'पल पल', 'तडप तडप' सारख्या सुपरहिट गाण्याचा गायक केकेच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी लाईव्ह शोनंतर केकेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
केकेच्या निधनाच्या केवळ दोन दिवस आधी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवालाचा चाहता वर्ग केवळ भारतातच नाही तर कॅनडा, ब्रिटेन आणि अमेरिकेतही होता. त्याच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध संतूर वादक, संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं 10 मे रोजी वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अनेक दिग्गज लोकांबरोबर त्यांनी अनेक हिट गाणी केली होती.
'नाचेंगे सारी रात' गाण्याचा गायक तरसेम सिंह सैनी याने लंडनमध्ये 29 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. तरसेमला 'स्टीरिओ नेशन' आणि 'ताज' या नावानं ओळखलं जातं होतं.
सर्वांचा लाडका गायक डिस्को किंग बप्पी लेहरीने 15 फेब्रुवारी रोजी वयाच्या 69व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बप्पी दा यांनी केवळ हिंदी नाही तर बंगली, तमिळ, तेलुगु, कन्नड भाषेतही अनेक गाणी गायली होती. जगभरातील चाहता वर्ग बप्पी दा यांच्या गाण्यांचा फॅन होता.
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन म्हणजे संगीत विश्वातील एका पर्वाचा अस्त होता. 6 फेब्रुवारी रोजी लता दीदींनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1940 ते 2000 चं दशक लता दीदींच्या गाण्यांनी गाजवला. त्यांची गाणी सदैव आपल्या स्मरणात राहतील.