स्थानिक नागरिक
पालनाडू, 18 जुलै : पावसाळा आला की, आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील सत्तेनापल्ली शहरात हिऱ्यांचा शोध सुरू होतो. स्थानिक लोकांचा असा ठाम विश्वास आहे की, एक हिरा सापडल्यास त्यांचं आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. त्यामुळे, रंगीत दगड आणि हिरे शोधण्यासाठी तेथील ‘डायमंड हंटर्स’ मुसळधार पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. शहराच्या बाहेरील बसवण्णा खाडीजवळील रिअल इस्टेट प्लॉटमध्ये असलेल्या मातीत त्यांचा शोध सुरू होतो. नेमका काय आहे हा प्रकार? हे प्लॉट बेल्लमकोंडा परिसरातून आणलेल्या लाल मातीने भरलेले आहेत. काही व्यक्ती मौल्यवान खजिना शोधण्याच्या आशेनं, हिरे आणि रंगीत दगडांच्या शोधात या मातीत येतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा स्थानिक लोकांचे गट एकत्रितपणे बाहेर पडतात आणि काळजीपूर्वक जमीन तपासतात.
रिअल इस्टेट डेव्हलपर्सनी पिदुगुरल्ला रोडलगत असलेल्या बसवम्मा वागू या शहरी उपनगरात एक प्रकल्प हाती घेतला होता. या उपक्रमाचा एक भाग म्हणून रस्ते बांधण्यासाठी बेल्लमकोंडा भागातील लाल मातीचा वापर करण्यात आला होता. याबद्दल माहिती असलेल्या काही व्यक्ती आता याच मातीत हिरे शोधत आहेत. केवळ सत्तेनापल्लीचे रहिवासीच नाहीत तर आसपासच्या नरसरावपेट, चिलाकालुरीपेट, ओंगोलू आणि विनुकोंडा या ठिकाणचे लोकंही या ठिकाणी येतात. विशेष म्हणजे हे लोक पेट्रोलचा आणि गाडी भाडं खर्चून या ठिकाणी येतात. हिरे सापडल्यानंतर ते सामान्यत: परिसरातील प्रतिष्ठित हिरे व्यापाऱ्यांना विकले जातात. वजन, रंग आणि प्रकार यासारख्या घटकांच्या आधारे हिऱ्यांचं मूल्य निर्धारित केलं जातं. सामान्यतः कॅरेटमध्ये त्यांची गणना केली जाते. या परिसरातील डायमंड हंटर्स ही आशा बाळगून आहेत की, एक हिरा सापडला तरी ते क्षणातच लक्षाधीश बनू शकतात. पूर्वी, बेल्लमकोंडा परिसरात असलेल्या कोल्लुरूमध्ये नागरिकांना हिरे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या काळात अधिक हिऱ्यांच्या शोधासाठी मजूर देखील ठेवले गेले होते. लोकांचा असा समज आहे की, बेल्लमकोंडा येथून आणलेल्या मातीमध्ये रत्नं किंवा रंगीत दगड आहेत. या शिवाय, येथील हिर्याच्या उत्पत्तीबद्दल अनेक सिद्धांत आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील कोल्लूर खाणीचा सिद्धांत सर्वांत मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्वीकारलेला आहे. हा प्रदेश विजयनगर साम्राज्य, कुतुबशाही साम्राज्य, मुघल आणि असफ जही निजाम यांसारख्या विविध साम्राज्यांच्या अधिपत्याखाली होता. 16व्या आणि 17व्या शतकादरम्यान, कोल्लूर खाण प्रसिद्धीच्या शिखरावर होती. या खाणीमुळेच कुतुबशाही राजघराण्याची राजधानी गोवळकोंडा हे शहर हिऱ्यांचं एक प्रमुख जागतिक केंद्र बनलं होतं.