उद्धव ठाकरे
मुंबई, 8 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल तात्पुरता निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. तसेच शिवसेना पक्षाचं देखील नाव दोन्ही गटाना पोटनिवडणुकीत वापरता येणार नाही. विशेष म्हणजे या निकालाआधी दोन्ही गटाकडून काल शपथपत्र सादर करण्यात आले. शिंदे गटाकडून सात लाख तर ठाकरे गटाकडून अडीच लाख शपथपत्रे सादर करण्यात आले होते. पण या शपथपत्रांविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांना बनावट शपथपत्रांचा मोठा गठ्ठा सापडल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन ठाकरे गटावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मुंबईत बनावट शपथपत्र घोटाळा स्टॅम्प पेपरचा वापर करुन शपथपत्रे बनवण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्रे बनवल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी 4 हजार 682 शपथपत्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीतील ही महत्त्वाची बातमी आहे. ( शिवसेनेला खूप मोठा झटका, धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचं नावही वापरता येणार नाही ) निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्रे सादर करायची होती ती पत्रे ठाकरे गटाकडून बनावट पद्धतीने बनवली जात होती, असा आरोप केला जातोय. वांद्र्यात आशिष गॅलरीचं दुकान आहे. तिथे नोटरी तयार केली जात होती. त्याच ठिकाणी एक मोठा गठ्ठा सापडला आहे. या गठ्ठ्यामध्ये शपथपत्रे बनवलेली होती. शपथपत्राचा मायना तयार होता. तिथे लोकांचा आधारकार्ड आणि बाकीचे डिटेल्स घेवून शपथपत्रे बनवली जात होती, त्यावर स्टॅम्प मारला जात होता आणि नोटरी केली जात होती. नोटरी ही अधिकाऱ्यांसमोर करावी लागते. पण तशा पद्धतीने शपथपत्रे तयार केले गेले नाहीत. त्यामुळे ही शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप केला जातोय. शिंदे गटाचे समर्थक नरेश म्हस्के यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांनी वांद्रे आणि माहीम या भागातून बनावट शपथपत्रे पकडली आहे. याचाच अर्थ निवडणूक आयोगाकडे जी बनावट शपथपत्रे सादर केली आहेत ती सुद्धा अशाच पद्धतीने बनावट असतील असा माझा ठाम आरोप आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या शपथपत्रांची सत्यता पडताळणीची गरज आहे”, असं नरेश म्हस्के म्हणाले.