गाझियाबाद, 7 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये शनिवारी रात्री उशिरा एका घरात घुसून दोन महिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेत तीन लहान मुलं गंभीररित्या जखमी झाली आहेत. पोलिस आणि स्थानिकांनी मिळून तीन जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केलं आहे. रुग्णालयात एका मुलाने दिलेल्या माहितीनुसार, हत्या करणारे जवळचेच असल्याचं समोर आलं आहे. शेजारी राहणाऱ्या वंदना यांनी या घटनेची माहिती सर्वप्रथम दिली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना रात्री दूध घेण्यासाठी बाहेर पडल्या त्यावेळी त्या घरातील एक महिला ट्यूशन घेत होती. परंतु वंदना परत आली तेव्हा घरात शांतता होती. शंका आल्याने तिने आवाज दिला, परंतु घरातील कोणीही उत्तर दिलं नाही. त्यानंतर वंदना घरात गेली आणि समोरील दृष्य पाहून तिला धक्काच बसला. घरातील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. तीन मुलांसह दोन महिला रक्ताच्या थारोळ्या पडल्या होत्या.
या घटनेत 33 वर्षीय महिला आणि तिच्याकडे ट्यूशनसाठी आलेल्या 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या दोघींवरही धारदार हत्यारांनी वार करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.