पुणे, 31 डिसेंबर : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, हेमामालिनी आणि भाजपचे खासदार सनी देओल यांच्याविरोधात पुणे दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. संजय काकडे आणि धर्मेंद्र यांच्यासोबत लोणावळा येथील एका जमिनीबाबत करार झाला होता. हा करार 31 मे 2018 रोजी करण्यात आला होता. लोणावळा येथील 210 एकर पैकी 145 एकर जमीन विकसित करून त्यावर हॉटेल आणि बंगले बांधण्याचा हा करार होता. हा करार अभिनेते धर्मेंद्र, हेमामालिनी आणि सनी देओल यांच्या सोबत झाला होता. परंतु, करार झाल्यानंतर सुद्धा विकसित करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. करारानुसार, 50 टक्के रक्कम ही देओल कुटुंबीय आणि 50 टक्के रक्कम ही संजय काकडे गुंतवणार होते. पण, याबद्दल देओल कुटुंबाकडून आजपर्यंत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नाही. मध्यंतरी, धर्मेंद्र यांचा ‘यमला पगला दिवाना’ सिनेमा आला होता. या सिनेमा धर्मेंद्र यांच्यासह त्यांची दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमाचे कारण देऊन करार पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या होत्या. निवडणुकांचा कारणे देऊन हा करार अंमलात आला नाही. आता निवडणुका झाल्यानंतर सुद्धा करारानुसार कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आपलं नुकसान होतं आहे, असं म्हणत संजय काकडे यांनी धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयाविरोधात पुणे दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. लोणावळा येथील 210 एकर पैकी 145 एकर जमीन विकसित करण्यासाठी आमचं ठरलं होतं. पण, यात त्यांनी 18 महिने घातले. आम्ही जो करार केला होता त्यात वेळोवेळी त्यांनी बदल केली. आता 18 महिने उलटल्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने 10 जानेवारीची तारीख दिली आहे. आम्हाला 145 एकर जमिनीवर काम करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी काकडेंनी केली. धर्मेंद्र यांच्यासोबत 15 ते 20 बैठक झाल्या आहे. सनी देओल यांच्यासोबतही बैठक झाल्या आहे. पण, त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. 145 एकर जमिनीवर हॉटेल आणि बंगल्यांचं बांधकाम करण्याचं ठरलं आहे, अशी माहिती काकडेंनी दिली. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.