नवी दिल्ली, 9 जानेवारी : थेरपी सुरू केल्यानंतर मुलाला अंथरूण ओलं करण्याची सवय सुटण्यास काही आठवडे किंवा महिने लागू शकतात. अनेक पालकांना आपल्या मुलांना झोपण्यापूर्वी पोटभर दूध प्यायला देण्याची सवय असते. त्यामुळे मुलाने अंथरूण ओलं केलं तर त्याची स्थिती आणखी बिघडू शकते आणि सवयही कायम राहते. परंतु, रात्रीच्या वेळी लहान मुलांना द्रव आहार कमी देताना बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही हेदेखील पाहणं आवश्यक असतं. पालकांपैकी एकाला आपल्या लहानपणी अंथरूण ओलं करण्याची सवय असेल तर त्यांचं मूलदेखील अंथरूण ओलं करण्याची शक्यता 14 ते 15 टक्के असते. दोघांनाही लहानपणी अशी सवय असेल, तर मुलाच्या बाबतीत ही शक्यता 45 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढते. याचा अर्थ अंथरूण ओलं करण्याची सवय ही आनुवंशिक असते. परंतु, काही असलं तरी ही सवय पालकांबरोबरच मुलांनाही त्रासदायक ठरते. बऱ्याचदा अशा सवयीमुळे पालकांना त्यांच्या मुलाला हॉस्टेलमध्ये ठेवता येत नाही. अनेक मुलांमध्ये ही सवय बराच काळ राहते. माझ्याकडे अशा व्यक्तीसुद्धा उपचारासाठी आल्या आहेत, ज्यांनी सांगितलं, की त्या 23 ते 25 वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे, अशी माहिती अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयाचे युरोलॉजिस्ट डॉ. संजय पांडे यांनी दिली. परंतु, त्यांना अंथरूण ओलं करण्याची सवय असल्याने लग्न करायचं नाही. त्यामुळे मुलांमध्ये या समस्येचं वेळीच निदान होणं नितांत गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना नंतरच्या अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांपासून वाचवता येईल. कधीकधी मुलं या समस्येबाबत थेट बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी याविषयी त्यांच्या वतीने बोलणं आवश्यक आहे; पण सहसा असंही घडतं, की पालकांना त्यांच्या मुलांच्या या सवयीविषयी माहिती नसतं; पण अशी गोष्ट कदापि होऊ नये. त्यामुळे अंथरूण ओलं करण्याच्या सवयीविषयी पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. या सवयीबद्दल चर्चा करणं आणि त्यांच्या मुलाला त्रास होत असल्यास अशा समस्येचं निदान करणं महत्त्वाचं आहे. 6 ते 15 वर्षं वयोगटातील मुलांमध्ये ही सवय जास्त काळ राहणार नाही, असा निर्धार पालकांनी केला पाहिजे. थेरपीच्या माध्यमातून ही सवय मोडता येते; मात्र काही मुलांमध्ये थेरपीनंतरही ही सवय दिसून येते. ‘आरओ फिल्टर’चं पाणी पीत असाल तर या गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक एखाद्या मुलाला अंथरूण ओलं करण्याची समस्या असेल तर डॉक्टर आणि पालकांनी एकत्र बसून याविषयी चर्चा केली पाहिजे. काही वेळा या चर्चेत शिक्षकांनादेखील सहभागी करून घेण्याची गरज भासते. मुलावर काही मानसिक आघात झाला आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच अंथरूण ओलं करण्याच्या सवयीमागे लैंगिक शोषणाची काही भूमिका नाही ना हेदेखील जाणून घेतलं पाहिजे. काही वेळा शाळा किंवा शहर बदलल्याने मुलांच्या मानसिक स्थितीत बदल होतो. या बदलामुळे मुलं आनंदी नसणं किंवा या गोष्टीचा मनावर ताण येणं हीदेखील कारणं या सवयीमागे असू शकतात. सुरुवातीला मुलाला अंथरूण ओलं करण्याची सवय नसते; पण अशा काही गोष्टींचा मनावर ताण आल्यास त्यांना ही सवय लागते. मूल काही मानसिक समस्यांचा सामना करत आहे की नाही हे सांगणं खूप कठीण असतं आणि म्हणून अशा गोष्टी ओळखणं आवश्यक आहे. ज्या मुलांना अंथरूण ओलं करण्याची सवय अचानकपणे लागते, अशा मुलांसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये अंथरूण ओलं करण्याच्या समस्येवर मात करताना, द्रव आहार कमी केल्याने बद्धकोष्ठता होत नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलाने शाळेत पँटमध्ये लघवी होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण ज्याला अंथरूण ओलं करण्याची सवय असते त्याला असा त्रास होऊ शकतो. अशा मुलांच्या बाबतीत शाळेची भूमिका महत्त्वाची ठरते. लहान मुलांमधल्या या समस्येचं निदान अत्यावश्यक आहे. मूल शाळेत जायला नकार देत असेल, तर त्यामागे हे संभाव्य कारण असू शकतं. एकंदरीत, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये पालक, डॉक्टर आणि शाळा या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे. यामुळे मुलांची अंथरूण ओलं करण्याची सवय सुटू शकते आणि सुटणंदेखील गरजेचं आहे, जेणेकरून मुलांच्या बौद्धिक विकासात अडथळा निर्माण होणार नाही.