20 एप्रिल : भाजपचे नेते मुंबईत चित्रपट विद्यापीठ सुरु करायचा निर्धार करतात. पण त्यांना गरिबांना मोफत अन्न व औषध द्यावेसे वाटत नाही. काँग्रेसने गेल्या 10 वर्षात 15 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, भाजप नेते स्वतः पोटभर जेवतात पण गरिबांच्या घरी फिरकलेही नाहीत. भाजपने गरिबांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत केली.
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदानात रविवारी राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
काँग्रेसचा जन्म मुंबईत झाला असून काँग्रेसची विचारधारा मुंबईच्या डीएनएतच आहे असे राहुल गांधींनी सांगितले. गेल्या 60 वर्षात काँग्रेसने काय केले असा सवाल नरेंद्र मोदी वारंवार विचारतात. या प्रश्नालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या 60 वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत होता आणि मोदी आल्यावर राज्याला नवसंजीवनी मिळून त्यांनी विकास केला असे दाखवण्याचा प्रयत्न मोदी करतात असेही त्यांनी सांगितले. अडवाणी, वाजपेयी व जसवंत सिंह या ज्येष्ठ नेत्यांना मंचावरुन उतरवून मोदींनी अदाणींना मंचावर बसवल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबईमध्ये मुलभुत सेवा सुविधांचे मोठे काम आघाडी सरकारने केले आहे. मुंबईत मोनोरेल सुरु झाली असून मेट्रोही लवकरच सुरु होईल.नुकताच सुरु झालेला चेंबुर-सांताक्रुझ लिंक रोडचा उल्लेख करुन राहुल गांधी म्हणाले, ही सर्व कामे काँग्रेस आघाडी सरकारने केली आहेत. भाजप सत्तेत होती तेव्हा त्यांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला.
मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या या सभेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येणार होत्या मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. त्यांच्या ऐवजी राहुल गांधींनी सभेला संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे देखील या सभेला उपस्थित राहाणार होते. मात्र ते देखील गैरहजर राहिले. हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ते उपस्थित राहु शकले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.