13 फेब्रुवारी : तेलंगणाच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. दुपारी बारा वाजता सरकारनं तेलंगणा विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर त्याला विरोध दर्शवणार्या तेलुगू देसम पक्षाच्या एल. राजागोपाल यांनी पेप्पर स्प्रे मारला, या प्रकारानंतर एल. राजागोपाल यांना निलंबित करण्यात आलं. त्यांच्यासह 17 खासदारांना निलंबित करण्यात आलंय. पण या प्रकारामुळे संसदेची अप्रतिष्ठा झाल्याची भावना व्यक्त केली जातेय.
सकाळी अकरा वाजता संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा तेलंगणाच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला.. दुपारी 12 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारनं लोकसभेत तेलंगणा विधेयक मांडलं. त्याला विरोध करणार्या एल. राजगोपाल या तेलुगू देसमच्या खासदारानं पेप्पर स्प्रे मारला, त्यामुळे तीन खासदारांवर वैद्यकीय उपचार करावे लागले. या प्रकारामुळे लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमारांसह अनेक ज्येष्ठ खासदार संतप्त झाले. यानंतर एल. राजगोपाल यांच्यासह 17 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
भाजपनं या सर्व घटनाक्रमासाठी काँग्रेसला जबाबदार ठरवलंय. एल. राजगोपाल यांनी मात्र स्वतःच्या कृत्याचं समर्थन केलं. उलट काँग्रेस खासदारांनीच आपल्यावर हल्ला केला असा आरोपही त्यांनी केला. त्यापूर्वी, आज सकाळी संसदेच्या बाहेर तेलंगणा समर्थक आणि तेलंगणा विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी या निदर्शकांमध्येच संघर्ष झाल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यासाठी संसदेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. एकंदरीतच आजचा दिवस संसदीय लोकशाहीसाठी लज्जास्पद ठरला यात काही शंका नाही.