10 ऑक्टोबर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आतापासूनच तापू लागलंय. त्यातच दिल्लीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर झाल्यात. आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासोबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आक्रमकपणे लोकांसमोर येत आहे. मोदींच्या आक्रमकतेला उत्तर देण्याची काँग्रेसची ही रणनीती असल्याचं बोललं जातंय. वादग्रस्त वटहुकुमार राहुल गांधींनी केलेल्या तितक्याच वादग्रस्त वक्तव्यामुळे यूपीए सरकारवर नामुष्कीची वेळ आली. पंतप्रधान दुखावले गेले. पण या निमित्तानं राहुल यांच्या बोलण्याला आलेली आक्रमकतेची धार निवडणुकीच्या तोंडावर वाढतच चाललीय. उत्तरप्रदेशातल्या जाहीर सभेत देशाचं भावी सरकार तरुणांचं असेल असं सांगत राहुल यांनी अनेक प्रकारच्या चर्चांना तोंड फोडलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्नं आता विचारली जातायत… - राहुलनी 2014 मध्ये स्वतः पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याचे संकेत दिलेत? - त्यांचं हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसमधल्या वयोवृद्धांना निवृत्तीची सूचना आहे? - की मोदींच्या मागे मोठ्या प्रमाणावर चाललेल्या तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा राहुल यांचा हा प्रयत्न आहे? राहुल यांचा महाराष्ट्र दौराही असाच गाजला. एकीकडे नरेंद्र मोदींचं निमित्त करून काँग्रेस मोठी आघाडी उभी करू पाहतेय. पण राहुल यांनी संघटनेत जोश येण्यासाठी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीसारखा मित्रपक्ष दुखावला गेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भाजप आक्रमक झालीय. प्रचाराचा भडिमार सुरू आहे. त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठीच राहुलनी आपली भूमिका आक्रमक केल्याची चर्चा आहे. म्हणूनच आतापर्यंत कोणत्याही मोठ्या घटनेवर साधी प्रतिक्रियाही न देणारे राहुल गांधी आता सातत्यानं लोकांसमोर रोखठोकपणे आपली आपली मतं मांडू लागलेत.