11 जुलै : घराच्या गॅलरीत किंवा अंगणात टांगलेल्या पिंजर्यातून पोपटाचा विठू विठू हा मधूर आवाज ऐकायचा आणि आपली हौस भागवायची हा प्रकार आता कायमचा बंद होणार आहे. माणसांच्या हौशीखातर आयुष्यभर पिंजर्यात बंद व्हायचं आणि या बंदीवासातच मरून जायचं हे चित्र बदलून बंदिस्त पोपटांना स्वातंत्र्य देण्याचं पाऊल वनविभागानं उचललं आहे. पाळीव पोपट पिंजर्यातून मुक्त करा, नाहीतर 25 हजार रूपये दंड भरा असा आदेशच वन विभागाने काढलाय. वन्यजीव अधिनियम 1972 नुसार पोपट पाळणारांवर ही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. घरामध्ये पक्षी आणि प्राणी पाळण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र पोपट पाळण्याला बंदीच आहे. पोपटांची पिल्लं पकडून त्यांची विक्री करणारं रॅकेटही राज्यात मोठं आहे. या पार्श्वभुमीवर पोपट पाळणं हा गुन्हा असून त्याविरोधात दंड करण्याचा निर्णय वन विभागाने घेतलाय. याबाबत वन्य जीव संरक्षण संस्थांनी वारंवार आक्षेपही नोंदवले आहेत. तरीही घरोघरी चोरून पोपट पाळले जात असल्याचं वन विभागाला आढळून आल्यानं हे पाऊल उचलण्याचं विभागानं ठरवलंय.