04 जानेवारी : सासवडच्या आचार्य अत्रे नगरीत सुरू असलेल्या 87 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उद्घाटनानंतर डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा संमेलनाध्यक्ष फ.मुं.शिंदे यांनी भाषणात उल्लेख न केल्यामुळे साहित्य वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अखेर आपल्या विसरभोळेपणातून जागे झालेल्या साहित्य महामंडळाने आज संमेलनाच्या दुसर्या दिवशी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना परिवर्तनवादी साहित्य हा परिसंवाद अर्पण केला आहे.
मात्र डॉ.दाभोलकर यांच्या सारख्या लेखकांचा विसर पडल्याबद्दल खुद्द संमेलनाध्यक्ष फ.मुं.शिंदे यांनी खेद सुद्धा व्यक्त केला नाही. दाभोलकरांचा चुकून विसर पडला अशी मोघम प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. डॉ.नरेंद्र दाभोलकर हे सामाजिक कार्यकर्तेच नसून साधना साप्ताहिकाचे संपादक आणि लेखक सुद्धा होते.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यांच्या कार्याची राज्य सरकारने दखल घेवून जादूटोणाविरोधी विधेयक कायदा अस्तित्वात आणला. मात्र दाभोलकर आपले चांगले मित्र होते असे सांगणारे संमेलानाध्यक्ष आपल्या भाषणात उल्लेखही करु शकले नाही. याबद्दल अनेक साहित्यिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज दुसर्या दिवशी आपल्याकडून झालेली चुकू सुधारुन काढत साहित्य महामंडळ तातडीने कामाला लागले आणि परिवर्तनवादी साहित्य हा परिसंवाद डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अर्पण केला. साहित्य महामंडळाला डॉ. दाभोलकराचा विसर पडलेला नाही अशी सारवासारव साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी केलीय.