02 जानेवारी : बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळ्याचा अहवाल अंशत: राज्य सरकारने स्वीकारला पण यावरुन मंत्रिमंडळामध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांवरचे ताशेरे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता.
रा़ष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि सुनील तटकरेंना वगळा, त्यांच्यावरचे ताशेरे मागे घ्या, नाहीतर वाईट परिणाम होतील अशी धमकी राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना दिली अशी माहिती सूत्रांनी दिली. एका प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांचा बचाव केलाय. हिवाळी अधिवेशनात या दोन्ही नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठकही झाली होती.
या बैठकीत काय निर्णय घ्यावा याला चालना देण्यात आली. त्यामुळे आज अहवाल स्वीकारतांना टोपे आणि सुनील तटकरेंना का वगळण्यात आलं असा प्रश्न उपस्थित झालाय. एकंदरीच आघाडीचा धर्म पाळत ‘आदर्श’ तडजोड झाल्याची चर्चा आता रंगली आहे.