28 जानेवारी :  पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्राला लाज वाटावी अशा घटना पुन्हा पुन्हा घडतायेत. हिंगोली जिल्ह्यातही अशीच एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. हिंगोलीतल्या शेंदा तालुक्यातल्या वाढोणा गावातल्या शरदचंद्र पवार मूकबधीर शाळेतल्या 7 वर्षांच्या मूकबधीर मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला आहे. तिच्या गुप्तांगांना आणि आतड्यांनाही गंभीर दुखापत झालीय. गंभीर अवस्थेत तिला नागपूरच्या सरकारी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी मुलीचे वडील करताहेत. लहान मुलींवर होणार्या बलात्काराच्या घटना वारंवार पुढे येताहेत. या चिमुकलीने आठवडाभर पूर्वीच पहिलीत प्रवेश घेतला होता. 13 जानेवारीला शाळेतल्या कर्मचार्यांनी तिची तब्येत बरी नसल्याचं सांगत तिला घरी आणून सोडलं. पण, घरी आणल्यावर काही वेळातच तिला रक्तस्राव होऊ लागला. डॉक्टरांकडे गेल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिल्लीतल्या निर्भयाला जशी गंभीर दुखापत झाली होती, तशीच स्थिती आज या चिमुकलीची आहे. या प्रकरणी गावकर्यांनी ठिय्या आंदोलनही केलंय. पण, तीन कर्मचार्यांना अटक करण्यापलिकडे अजून काहीही कारवाई झालेली नाही.