**06 फेब्रुवारी :**कोल्हापुरकरांनी आज पुन्हा एकदा टोलविरोधात रणशिंग फुंकलं आहे. कोल्हापुर टोलविरोधी कृती समितीने आज ‘कोल्हापूर बंद’ ची हाक दिली आहे. काल टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आयआरबीने कडक पोलिसबंदबस्तात काल टोलवसुलीला पुन्हा सुरुवात केली. याचा विरोध करत काल कोल्हापुरच्या नगरसेवकांनी महापालिकेत एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षाच्या अध्यक्षांकडे आपले राजीनामे दिलेत. त्यानंतर महापौरांसह नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी शिरोली टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन करत टोलवसुली बंद पाडली. यावेळी काही नगरसेवक आणि पोलिसांमध्ये झटापड झाली. या झटापटीत महापौर सुनिता राऊत यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांच्यावर लाठीहल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कोल्हपूरमध्ये पोलिसांविरोधात आता संत्पत वातावरण निर्माण झाले आगे. काल संध्याकाळी प्रा. एन.डी.पाटील यांच्या घरी टोलविरोधी कृती समितीने महापौरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज (गुरूवारी) ‘कोल्हापुर बंद’ची हाक दिली आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातल्या 9 टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. टोलचा प्रश्न सुटला नाही तर कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील या कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कोल्हापूरकर करतायत. दरम्यान, टोलविरोधी कृती समितातर्फे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या आरोपावर, हा प्रश्न सुटला नाही तर राजीनामा देण्याची आपली तयारी आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.