30 जानेवारी : महायुतीने पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज नारळ फोडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात म्हणजे इचलकरंजीत महायुतीने पहिला जंगी मेळावा घेतला.
या मेळाव्याला राजू शेट्टींसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, आरपीआयचे अध्यक्ष नेते रामदास आठवले उपस्थित होते. या सर्वच नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार तोफ डागली. आघाडी सरकार हे घोटाळ्यांचं सरकार आहे, ते उलथवून टाकू असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला. सत्तेत आल्यावर टोलमुक्त महाराष्ट्र करू, वीजेचे दर कमी करू, अशी घोषणा गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
मुंडे, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही तोफ डागली. तर महायुतीत सहाव्या पक्षाची गरज नसल्याचं रामदास आठवले म्हणाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतकरी संघटनेचा आसूड महायुतीच्या नेत्यांना भेट दिला. दरम्यान, 16 फेब्रुवारीला बीडमध्ये महायुतीची आणखी एक महासभा होणार आहे. तर 25 फेब्रुवारीला विधानसभेवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.